Sangli: गुड्डापुरात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 06:02 PM2024-05-09T18:02:39+5:302024-05-09T18:02:49+5:30
माडग्याळ : जत तालुक्यातील गुड्डापूर येथे बँक व खासगी सावकारीला कंटाळून शेतकऱ्याने राहत्या घराशेजारील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ...
माडग्याळ : जत तालुक्यातील गुड्डापूर येथे बँक व खासगी सावकारीला कंटाळून शेतकऱ्याने राहत्या घराशेजारील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. सुखदेव मनगेनी बिराजदार (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी सकाळी बिराजदार यांच्या सुनेला सासरे सुखदेव हे घराशेजारील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसले.
पोलिसांकडून आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव बिराजदार यांनी सोसायटी, बँक व सावकारी कर्जातून दुग्ध व्यवसायाच्या उद्देशाने जर्सी गायी खरेदी केल्या होत्या. पण काही गायींचा आजारामुळे मृत्यू झाला. त्यामुळे केलेल्या गुंतवणुकीचे मोठे नुकसान झाले होते. सध्या ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सुखदेव हे कर्जात बुडाले होते. तशातच काहींनी वसुलीसाठी तगादा लावला होता. कर्जाच्या वसुलीला वैतागून सुखदेव यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांकडून पुढे आली आहे.
मृत सुखदेव बिराजदार यांच्या पश्चात वृद्ध आई, मुलगा, मुलगी व सून असा परिवार आहे. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. जत पोलिस अधिक तपास करत आहेत.