Sangli: खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कर्जदाराचा आत्महत्येचा प्रयत्न, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 03:49 PM2023-08-21T15:49:53+5:302023-08-21T15:50:12+5:30
५० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते
आष्टा : कोरेगाव (ता. वाळवा) येथील अमोल पाटील व इतर तीन खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून धोंडीराम आनंद संकपाळ (रा. कोरेगाव) यांनी शनिवारी रात्री विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौघांविरुद्ध रविवारी आष्टा पोलिस ठाण्यात खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धोंडीराम संकपाळ यांचे कोरेगाव राजारामनगर (ता. वाळवा) याठिकाणी सलूनचे दुकान आहे. त्यांनी अमर दिनकर पाटील यांच्याकडून ५५ हजार रुपये, स्वप्नील नामदेव पाटील यांच्याकडून एक लाख रुपये, सागर माणिक पाटील यांच्याकडून दहा हजार, तर यशवंत पाटील यांच्याकडून ५० हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते.
कर्जाची रक्कम परत करूनही खासगी सावकारांनी संकपाळ यांच्या दुकानासमोर जाऊन वारंवार शिवीगाळ व दमदाटी केली होती. या त्रासाला कंटाळून संकपाळ यांनी विषारी औषध प्राशन केले होते. संबंधितावर खासगी सावकारीप्रकरणी आष्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक महेश गायकवाड तपास करीत आहेत.