पुन्हा एकदा बीओटीचा मोह!

By admin | Published: April 8, 2016 11:24 PM2016-04-08T23:24:07+5:302016-04-08T23:57:27+5:30

सत्ताधाऱ्यांचा डाव : मोक्याच्या भूखंडांचे श्रीखंड लाटणार

BOT again! | पुन्हा एकदा बीओटीचा मोह!

पुन्हा एकदा बीओटीचा मोह!

Next


शीतल पाटील -- सांगली
महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसने पुन्हा एकदा बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर शहरातील मोक्याच्या जागा विकसित करण्याचा घाट घातला आहे. काँग्रेसने केलेल्या यापूर्वीच्या बीओटीवर लेखापरीक्षकांपासून ते उच्च न्यायालयापर्यंत ताशेरे ओढले गेले आहेत. तरीही बीओटीचा मोह काहीकेल्या सुटलेला दिसत नाही.
दहा वर्षापूर्वी तत्कालीन काँग्रेसच्या सत्ताकाळात शहरातील मोक्याच्या जागा विकसकाच्या घश्यात घालण्यात आल्या. अगदी कवडीमोल किमतीने या जागांचा बाजार झाला. महासभेतील गोंधळाचा फायदा घेत ऐनवेळी बीओटीचा ठराव करण्यात आला. नंतर गाळ्याची विक्री होत नसल्याचे कारण देत या जागांची मालकी विकसकाच्या हातात सोपविण्यात आली. याविरोधात वि. द. बर्वे व इतरांनी शासनाकडे तक्रारी केल्या.
महापालिकेच्या कारभाराचे विशेष लेखापरीक्षण झाले. त्यात बीओटीवर ताशेरे ओढले गेले. अगदी उच्च न्यायालयात खटले दाखल झाले. न्यायालयानेही बीओटीवर शासनालाच धारेवर धरले आहे. बीओटीतून महापालिकेच्या हाती काय पडले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एकीकडे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण दिले जात असताना, या बीओटीतून पालिकेच्या तिजोरीत किती कर जमा होतो, याचा हिशेब जरी घातला तरी, बीओटीतून फारसे काहीच हाती पडल्याचे दिसून येणार नाही.
काँग्रेसच्या वाट्याला यापूर्वीच्या बीओटीतून मोठी बदनामी आली आहे. तरीही त्यातून काही शहाणपण त्यांना आलेले दिसत नाही. उलट बीओटीचा मोह अजूनही सुटलेला नाही. आता विद्यमान महापौर हारूण शिकलगार यांनी दहा जागा बीओटीतून विकसित करण्याची घोषणा केली आहे. या जागांचाही बाजार होणार नाही, याची हमी महापौरांना द्यावी लागेल. आतापर्यंतचा अनुभव पाहता विकसक व नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे बीओटीतून कोटकल्याण झाले आहे. आताही तोच प्रकार होणार असेल तर नागरिकांनाच उठाव करावा लागेल. मोक्याच्या भूखंडांची विक्री करून स्वत:ची तुंबडी भरण्याच्या वृत्तीमुळे बीओटी पुरती बदनाम झाली आहे. सध्या तरी पूर्वीसारखा गुपचूप कारभार सुरू आहे.

पार्किंगचे काय? : समस्या आणखी बिकट
सांगलीतील अतिथीगृह, प्रसुतीगृह, शिवाजी मंडई, जुनी भाजी मंडई, गोकुळ नाट्यगृह या मुख्य बाजारपेठेतील जागा बीओटीतून विकसित करण्यात येणार आहेत. सध्या बाजारपेठेत सर्वात मोठी समस्या पार्किंगची आहे. त्यात मंदीमुळे बाजारपेठेतील उलाढाल कमी झाली आहे. अशा स्थितीत महापालिकेने व्यापारी संकुले उभारली तर पार्किंगचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. पण त्याचा विचार विद्यमान सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. केवळ बीओटीतून स्वकल्याण साधण्याचा त्यांचा डाव असल्याची टीकाही होऊ लागली आहे.


कोण, काय म्हणाले?
शहरातील मोक्याच्या जागा लाटण्याचा हा उद्योग आहे. यापूर्वीच्या बीओटीवर न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. यातून काहीच शहाणपण कारभाऱ्यांनी घेतल्याचे दिसत नाही. आमदार सुधीर गाडगीळ यांनी आता तरी पालिका कारभारात लक्ष घालून जागा वाचवाव्यात.
- वि. द. बर्वे
नागरिक हक्क संघटना


बीओटीतून जागा विकसित करताना पारदर्शकपणा हवा. सत्ताधाऱ्यांनी दहा जागा बीओटीतून विकसित करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्याचा प्रस्ताव कसा येतो, त्यावर आमची भूमिका ठरेल. छुप्या पद्धतीने जागा लाटण्याचा उद्योग असेल तर आम्ही विरोध करू.
- गौतम पवार
नगरसेवक, स्वाभिमानी

Web Title: BOT again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.