नागेवाडी मतदार संघात दोन्ही भाऊंची ‘फिल्डिंग’
By admin | Published: December 31, 2016 12:00 AM2016-12-31T00:00:18+5:302016-12-31T00:00:18+5:30
इच्छुकांची मांदियाळी : काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांमध्ये युतीची शक्यता; शिवसेनेचे मावळेही सरसावले
दिलीप मोहिते ल्ल विटा
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे ‘होमपीच’ असलेला खानापूर तालुक्यातील नागेवाडी जिल्हा परिषद गट खुला झाल्याने इच्छुकांची मांदियाळी दिसत आहे. येथे आ. बाबर यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी त्यांना रोखण्यासाठी प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आ. सदाभाऊ पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या युतीची शक्यता आहे.
गतवेळी आ. बाबर राष्ट्रवादीत होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या किसन जानकर यांनी कॉँग्रेसच्या सदाशिव खुपकर यांचा पराभव केला होता. नागेवाडी व गार्डी पंचायत समिती गणातही राष्ट्रवादीमधून माजी उपसभापती सुहास बाबर व सौ. भारती पाटील विजयी झाले होते. सुहास बाबर यांनी गार्डी गणात विरोधी कॉँग्रेसचे राजकुमार जगताप यांच्यावर, तर भारती पाटील यांनी कॉँग्रेसच्या सौ. शिवानी देशमुख यांच्यावर विजय मिळविला होता. हा गट आ. बाबर यांचे होमपीच असल्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीचा शिरकाव रोखण्यासाठी शिवसेनेचे मावळे सज्ज झाले आहेत.
यंदा हा गट खुला झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. या गटात जोंधळखिंडी, रेणावी, वासुंबे, माधळमुठी, सांगोले व भांबर्डे ही नवीन सहा गावे समाविष्ट केली आहेत. गेल्या निवडणुकीत या सहा गावांपैकी जोंधळखिंडी, रेणावी व भांबर्डेत कॉँग्रेसला, तर वासुंबे, माधळमुठी आणि सांगोलेत राष्ट्रवादीला मताधिक्य मिळाले होते. पुनर्रचना झाल्यामुळे या गटातील गावांची संख्या आता २० झाली आहे. नागेवाडी पंचायत समिती गणात नऊ व गार्डी गणात ११ गावांचा समावेश आहे.
नागेवाडी गटात शिवसेनेचे सुहास बाबर, सांगोलेचे माजी आदर्श सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत देवकर, हिंगणगादेचे शंकर मोहिते व खानापूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर यांची नावे चर्चेत आहेत.
माहुलीचे माजी जि. प. सदस्य, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील हेसुध्दा इच्छुक आहेत. परंतु, भाळवणी गणातून कॉँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी दिल्यास तेथून शिवसेनेचे सुहास बाबर निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. कॉँग्रेसमधून वेजेगावचे उद्योजक आनंदराव देवकर, तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, माहुलीचे संग्रामसिंह देशमुख यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यात देवकर यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीमधून तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, माहुलीचे अॅड. वैभव माने यांची चर्चा आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाल्यास ही जागा राष्ट्रवादीला दिली जाण्याची शक्यता आहे.
नागेवाडीत यावेळी शिवसेनेला शह देण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन कडवे आव्हान उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही ठिकाणी शिवसेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. मतदार संघाच्या उमेदवारीसाठी आता पक्षाच्या नेत्यांकडे इच्छुकांनी एकच गर्दी केली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची चाचपणी
नागेवाडी पंचायत समिती गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्या गणातून कॉँग्रेसचे नागेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य संग्राम माने, शिवसेनेतून नागेवाडीचे माजी सरपंच बबन सुतार, राष्ट्रवादीमधून विद्यमान जि. प. सदस्य किसन जानकर तर भाजपमधून राजू जानकर यांची नावे चर्चेत आहेत. गार्डी गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने तेथून कॉँग्रेसमधून तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख यांच्या पत्नी व जिल्हा बॅँकेच्या माजी संचालिका सौ. राजश्री देशमुख, राष्ट्रवादीमधून माहुलीच्या अॅड. सौ. स्वप्नाली माने, शिवसेनेतून सांगोलेच्या सरपंच सौ. कविता देवकर यांची नावे चर्चेत आहेत