भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे प्रयत्न
By admin | Published: March 3, 2017 11:44 PM2017-03-03T23:44:10+5:302017-03-03T23:44:10+5:30
जिल्हा परिषदेतील सत्तेचा पेच : राष्ट्रवादीकडूनही जुळवाजुळव; भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक
सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २१ मार्च रोजी होत आहे. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्तेचा दावा केला असून त्यांना रोखण्यासाठी भाजपच्या नेत्यांचीही रयत विकास आघाडी आणि शिवसेनेशी बोलणी चालू आहेत.
जिल्हा परिषदेत बहुमत सिध्द करण्यासाठी ३१ संख्याबळ पक्षाकडे असण्याची गरज आहे. या आकड्याची जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही खूप कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसकडे १० आणि राष्ट्रवादीकडे अपक्षासह १५ अशी २५ सदस्यांची संख्या आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे आमचेच असून ते कुठेही जाणार नाहीत, असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. घोरपडे गटाच्या दोन सदस्यांसह दोन्ही काँग्रेसकडे २७ सदस्यसंख्या होत आहे. बहुमत सिध्द करण्यासाठी दोन्ही काँग्रेसला पुन्हा चार सदस्यांची गरज आहे. यासाठी खरे प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने रयत विकास आघाडीतील नानासाहेब महाडिक गटाच्या तीन सदस्यांवर डोळा ठेवला आहे. महाडिक गटाशी बोलणीही चालू आहेत. परंतु, महाडिक गटाकडेही भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जोरात फिल्डिंग लावली आहे. यामुळे महाडिक गटाशिवाय अन्य सदस्य कसे मिळतील, याचा काँग्रेस नेते प्रयत्न करीत आहेत. रयत आघाडीतील कामेरी (ता. वाळवा) आणि वाळवा गट अशा दोन सदस्यांना काँग्रेसकडे खेचण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सदस्यही काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. तरीही काँग्रेसचा बहुमताचा आकडा ३१ पर्यंत पोहोचत नसल्यामुळे पुन्हा त्यांना महाडिक अथवा शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याशी चर्चा करावीच लागणार आहे.
भाजपची २५ सदस्यसंख्या असून रयत विकास आघाडी चार आणि शिवसेना तीन अशी त्यांची ३२ सदस्यसंख्या होत आहे. रयत आघाडीचे कामेरी आणि वाळवा गटातील सदस्य भाजपबरोबर राहतील, अशी शक्यता कमी आहे. यामुळे त्यांची पुन्हा दोन सदस्यसंख्या कमी होऊन ते ३० पर्यंतच राहणार आहेत. घोरपडे गटाशी भाजप बोलणी करणार आहे. पण, भाजपचे खासदार संजयकाका पाटील गटाचे घोरपडे गटाशी जमत नसल्यामुळे, ते किती साथ देतील हे निवडीवेळीच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी नूतन सदस्य आणि कोअर कमिटीच्या नेत्यांची दि. ४ रोजी मिरजेत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतच सत्ता स्थापण्याचे गणित निश्चित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
रयत आघाडी सदस्यांचा : काँग्रेसकडून सत्कार
रयत विकास आघाडीचे सर्व चार सदस्य आमचेच आहेत, असे भाजपचे नेते सांगत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला रयत विकास आघाडीचे सम्राट महाडिक यांनी त्यांच्या तीन समर्थक सदस्यांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. यावेळी नूतन सदस्यांचा कदम यांच्याहस्ते सत्कारही करण्यात आला. यामुळे रयत विकास आघाडीच्या सदस्यांचा पाठिंबा नक्की कुणाला मिळणार?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या दि. २१ मार्च रोजीच रयत आघाडीचा पाठिंबा कुणाला मिळाला, हे निश्चित होणार आहे.