कोरोना सेंटरमधून पळालेले दोन्ही गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 04:17 PM2020-10-06T16:17:08+5:302020-10-06T16:24:19+5:30
covidcenter, sangli, jail, criminals, arrest कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधून पलायन केलेल्या दोन गुन्हेगारांनी अटक करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले.
सांगली : कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधून पलायन केलेल्या दोन गुन्हेगारांनी अटक करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. गेली दहा दिवस दोन्ही गुन्हेगार पसार होते. कोरोना सेंटरमधून पळून गेल्यानंतर या दोघांनी शहरात एक चारचाकी मोटार चोरल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
राजा ऊर्फ राजू नागेश कोळी (वय २०, हरीपूर काळीवाट, सांगली), नाग्या ऊर्फ नागेश ऊर्फ रोहित बाळू जगदाळे (१९, पोळ मळा, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) अशी दोन्ही गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांनी साथीदारांसह २३ आॅगस्ट रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास कोल्हापूर रस्ता परिसरात थांबलेल्या ट्रक चालकाला लुटले होते.
शहर पोलिसांनी १७ सप्टेंबर रोजी दोघांनाही अटक केली व त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. कारागृहात नेण्यापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना कारागृहातील कैद्यांसाठी कॉलेज कॉर्नर येथे उभारलेल्या एका वसतिगृहातील अलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले होते.
रविवार २७ सप्टेंबर रोजी पहाटे खिडकीच्या काचा काढून, दोन गजांमधून ते बाहेर आले व मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीवरून उड्या मारून त्यांनी पलायन केले. याप्रकरणी गार्ड ड्युटीवर असणाऱ्या चार पोलिसांची तातडीने बदली करण्यात आली होती.
या गुन्हेगारांच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली होती. दोन्ही गुन्हेगारांना कोरोना सेंटरमधून पलायन केल्यानंतर सांगलीतून एक चारचाकी वाहनही चोरले होते. त्यातून ते पसार झाले होते. यापैकी राजू कोळी हा कऱ्हाडमध्ये असल्याची माहिती मिळताच एलसीबीचे उपनिरीक्षक प्रविण शिंदे, बिरोबा नरळे, संतोष गळवे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांना रोहित जगदाळे हा शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने जगदाळे याला ताब्यात घेतले. या दोघांनाही विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.