साडेअठरा लाखजणांना डिसेंबरअखेरपर्यंत कोरोनाचे दोन्ही डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:41+5:302021-09-08T04:32:41+5:30
सांगली : जिल्ह्यातील सर्व पात्र साडेअठरा लाख लाभार्थ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात येणार आहेत. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या ...
सांगली : जिल्ह्यातील सर्व पात्र साडेअठरा लाख लाभार्थ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात येणार आहेत. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत त्यासंदर्भात नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले.
अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध खात्यांचे सभापती व अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचे लसीकरण जिल्ह्यात सध्या वेगाने सुरू आहे. आजवर सुमारे १३ लाख लाभार्थ्यांना एक डोस दिला आहे. सुमारे पाच लाख लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना डिसेंबरअखेरपर्यंत दोन्ही डोस देण्याचे ठरले. त्यासाठी नियोजनाचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले. जिल्ह्यात १८ वर्षांवरील १८ लाख ५० हजार पात्र लाभार्थी आहेत.
विविध व्यावसायिकांना जिल्हा परिषदेची ना हरकत घेणे, तसेच नूतनीकरण करणे बंधनकारक असते, पण ते प्रामाणिकपणे केले जात नाही. अशा व्यावसायिक व संस्थांचा शोध घेऊन नूतनीकरण करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जिल्हा परिषदेचा स्वीय निधी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डुडी म्हणाले.
मुद्रणालयात आवश्यक कर्मचारी भरुन पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे ठरले. शेळी वाटप योजना आठवडाभरात पूर्ण करण्याचे ठरले. कृषी विभागात ट्रॅक्टर लाभार्थ्यांना अनुदानासाठी दरकराराची सक्ती रद्द करण्यात आली. अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध नसल्यास प्राथमिक शाळेत भरवण्याची सूचना करण्यता आली.