सांगलीत लूटमार टोळीतील दोघांना अटक
By admin | Published: January 18, 2015 11:52 PM2015-01-18T23:52:49+5:302015-01-19T00:32:47+5:30
थरारक पाठलाग : तमिळनाडूच्या पाचजणांना लुटल्याचा छडा; पाच मोबाईल जप्त
सांगली : पोलीस असल्याची बतावणी करुन तमिळनाडूतील गलई व्यावसायिकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पाच मोबाईल व साडेपाच हजारांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेला शनिवारी रात्री यश आले. या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे, तर अंधाराचा फायदा घेत इतर दोघांनी पलायन केले. महेश गुराप्पा शिंदे (वय २०, रा. दसरा चौक, काळ्या खणीजवळ, सांगली) व आकाश बसुराज छलवादे (१९, भीमनगर, टिंबर एरिया, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.तमिळनाडूचे गलई व्यावसायिक मनिकंडन ईश्वरचरण, विनोदकुमार, प्रभाकरण गोपी, मथुकुमार स्वामी, तसेच शिवाजी सुर्वे हे त्यांचे सांगलीवाडीचे मित्र अभिजित कृष्णाजी घबाडे यांना १५ जानेवारीला भेटण्यास आले होते. रात्री जेवण करुन ते शहरात फिरायला आले होते. संजयनगरमधील आरवाडे पार्क परिसरातून ते जात असताना संशयितांनी त्यांना अडविले व पोलीस असल्याची बतावणी करुन चाकूचा धाक दाखवून काठीने मारहाण केली. त्यांच्याकडील पाच मोबाईल व साडेपाच हजारांची रोकड घेऊन पलायन केले होते. संशयितांच्या मारहाणीत शिवाजी सुर्वे व मुथुकुमार स्वामी जखमी झाले होते. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. याप्रकरणी अभिजित घबाडे यांनी फिर्याद दाखल केली होती. यामध्ये त्यांनी केलेल्या वर्णनावरुन संशयित टोळीचा शोध सुरु होता. दसरा चौक परिसरात चौघे संशयितरित्या फिरताना सापडले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळाले. अखेर थरारक पाठलाग करुन त्यांना पकडण्यात यश आले. यातील दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्याचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)
इसर्डेनंतर नवीन टोळी तयार...
शिंदे मळा, टिंबर एरिया परिसरात लोकांना अडविणाऱ्या इसर्डे टोळीने धुमाकूळ घातला होता. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या टोळीस अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याखाली अटक केली. तेव्हापासून लूटमारीचा हा प्रथमच गुन्हा घडला आहे. ही टोळी प्रथमच रेकॉर्डवर आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, सहाय्यक फौजदार सुनील कोलप, हवालदार गुंडोपंत दोरकडर, अभिजित वाघमारे, झाकीर काझी, शीतल पाटील, निलेश कोळेकर यांच्या पथकाने केली.