तासगावमध्ये कोरोना चाचणी न करता दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:18+5:302021-05-21T04:27:18+5:30
तासगाव : कोरोनोची कोणती चाचणी न करताच, वायफळे (ता. तासगाव) येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा संदेश आरोग्य विभागाकडून आला ...
तासगाव : कोरोनोची कोणती चाचणी न करताच, वायफळे (ता. तासगाव) येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा संदेश आरोग्य विभागाकडून आला आहे. आरोग्य विभागाच्या यादीत निगेटिव्ह रुग्णांच्या नावांचा समावेश झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
तासगावच्या आरोग्य विभागाने १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत वायफळे येथील दोन नावे जाहीर करण्यात आली होती. यादीतील मोबाइल नंबरवरून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी संबंधित दोघांशी संपर्क साधला. त्यावेळी मात्र संबंधित दोघांनी चाचणी केली नसल्याचे आणि दोघेही पॉझिटिव्ह नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.
आरोग्य केंद्राने दफ्तर तपासले, त्यावेळी दोघांचे आरटीपीसीआर तपासणीसाठी नमुने घेतलेच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दोघांचा अहवाल प्रलंबित असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र, तालुक्यावरून आलेल्या यादीत तर या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. या सगळ्या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.