दोघे संशयित दोषमुक्त
By admin | Published: May 1, 2016 12:23 AM2016-05-01T00:23:12+5:302016-05-01T00:26:53+5:30
इस्लामपूर : डॉक्टर दाम्पत्य खून प्रकरण
इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यास हादरवून सोडणाऱ्या डॉ. प्रकाश व डॉ. अरूणा कुलकर्णी या दाम्पत्याच्या खुनप्रकरणातील दोघा संशयितांना शनिवारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सौ. सी. एच. चव्हाण यांनी फौजदारी संहिता कलम १६९ अन्वये दोषमुक्त केल्याचा निकाल दिला. त्यामुळे आता एकाच संशयिताविरोधात या दुहेरी खून खटल्याचे कामकाज चालणार आहे.
निलेश भास्कर दिवाणजी (वय २९) व सीमा बाळासाहेब यादव (वय ३६, रा. दोघेही शिवनगर, इस्लामपूर) अशी दोषमुक्त करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (वय ६५) व डॉ. अरूणा प्रकाश कुलकर्णी (वय ५८, रा. जावडेकर चौक, इस्लामपूर) या दोघांचा त्यांच्याच धारित्री क्लिनिक या रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील निवासस्थानी धारधार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला होता. ही घटना १९ डिसेंबर २०१५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ती दुसऱ्या दिवशी २० डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत संदीप वामन कुलकर्णी (वय ५२, रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.
या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने निलेश दिवाणजी, परिचारिका सीमा यादव या दोघांसह अर्जून रमेश पवार (वय १७, रा. हनुमाननगर, इस्लामपूर) या तिघांना अटक करून त्यांच्याकडे तपास केला. या तपासादरम्यान दिवाणजी आणि सीमा यादव यांच्याविरोधात पुरावे आढळून न आल्याने २८ मार्च रोजी येथील न्यायालयात त्या दोघांना दोषमुक्त करावे, असा अहवाल दिला . त्याचवेळी अर्जून पवार याच्याविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अहवालावर फिर्यादीचे म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार फिर्यादी संदीप कुलकर्णी यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सरकार पक्ष आणि बचाव पक्षाचे वकील विजय काईंगडे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निलेश दिवाणजी व सीमा यादव यांना दोषमुक्त करण्याचे आदेश दिले.