नालोसोपराप्रकरणी एटीएसने ताब्यात घेतलेले दोघे सांगलीत चक्क थेट पत्रकार परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 03:38 PM2018-08-25T15:38:23+5:302018-08-25T15:57:08+5:30
मुंबईतील नालोसोपरा येथे सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाने ज्या दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त होते, त्या सचिन कुलकर्णी, किरण पोळ यांनाच खुद्द हिंदूत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सांगलीत थेट पत्रकार परिषदेत हजर केले. प्रसिद्ध वृत्ताचा आधार घेऊन एटीएसने तासगाव येथील सनातनचे साधक सचिन कुलकर्णी यांच्याकडे चौकशी करुन जबाब नोंदवून घेतल्याची माहिती समस्त पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली : मुंबईतील नालोसोपरा येथे सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी दहशतवाद विरोधी (एटीएस) पथकाने ज्या दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त होते, त्या सचिन कुलकर्णी, किरण पोळ यांनाच खुद्द हिंदूत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सांगलीत थेट पत्रकार परिषदेत हजर केले. प्रसिद्ध वृत्ताचा आधार घेऊन एटीएसने तासगाव येथील सनातनचे साधक सचिन कुलकर्णी यांच्याकडे चौकशी करुन जबाब नोंदवून घेतल्याची माहिती समस्त पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एटीएसने कोणाचीही चौकशी करावी. आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. पुरोगामी नेत्यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पकडलेच पाहिजे, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली.
अंधश्रद्धा निर्मृलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तासगावमध्ये सनातनच्या दोन साधकांची चौकशी केल्याचे वृत्त सोशल मिडिया व प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भातील वस्तूस्थिती सांगण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र , कोकण आणि गुजरात राज्याचे समन्वयक मनोज खाड्ये, सांगली जिल्हा अधिवक्त परिषदेचे अध्यक्ष समीर पटवर्धन, शिवसेना कामगार सेनेचे उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, एसटीएसने सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात सनातनच्या एकाही साधकाची चौकशी केलेली नाही. सोशल मिडिया व काही प्रसारमाध्यमातून पोळ व कुलकर्णी या दोन साधकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचा आधार घेऊन एसटीएसचे कदम व सांगली पोलीस दलातील काही पोलिसांचे पथक शुक्रवार दि. २४ आॅगस्ट रोजी सचिन कुलकर्णी यांच्याकडे चौकशी गेले होते.
कुलकर्णी दुपारी सव्वादोन वाजता त्यांच्या दुकानात होते. पथकाने त्यांची दुकानात भेट घेतली. सनातनमध्ये कधीपासून काम करता, तुमच्याकडे कोणत्या स्वरुपाचे काम आहे, प्रसारमाध्यमातून तुमचे नाव आले आहे, यापूर्वी एटीएसने तुमची चौकशी केली आहे का? अशी प्रश्ने विचारली.
याशिवाय पंधरा दिवसापूर्वी मुंबईतील नालोसोपऱ्यात सापडलेल्या शस्त्रसाठा व स्फोटकेप्रकरणीही चौकशी केली. या शस्त्रसाठाप्रकरणी अटक केलेल्या साताऱ्यातील सुधन्वा गोंधळेकर याच्याशी तुमची ओळख आहे का? अशीही पथकाने विचारणा केली. पथकाच्या कुलकर्णी यांचा रितसर जबाबही घेतली आहे.
धर्मद्रोही मंडळींचे काम
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे या पुरोगामी नेत्यांच्या झालेल्या हत्यांचा निषेधच केला आहे. त्यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना पकडलेच पाहिजे, अशी आमची आजही मागणी आहे. पण काही धर्मद्रोही मंडळी सनातन संस्था व त्यांच्या साधकांना यामध्ये ओढण्याचे काम जाणीवपूर्वक करीत आहेत.
तपास यंत्रणेही कोणचाही चौकशी करावी. तो त्यांना अधिकार आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास व तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत. पण जाणीवपूर्वक सनातन संस्था व हिंदूत्वादी कार्यकर्त्यांची कोणी बदनामी करीत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करावी.
गायकवाड, तावडेला जामीन
पुरोगामी नेत्यांच्या हत्येप्रकरणी विरेंद्र तावडे व समीर गायकवाड यांना अटक केली. पण तपास यंत्रणेला त्यांच्याबद्दल ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने या दोघांची जामिनावर मुक्तता केली आहे. शस्त्रसाठा असो अथवा हत्येचे प्रकरण सातत्याने सनातन व हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना चौकशीच्या जाळ्यात पकडले जात आहे. ठोस पुरावे मिळत नसतानाही दबावतंत्रापोटी तपास यंत्रणा अटकेची कारवाई करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
कुलकर्णी, पोळ हजर
कुलकर्णी व पोळ यांना एसटीएसने ताब्यात घेतल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण राज्यभरात पसरले. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सचिन कुलकर्णी, किरण पोळ यांनाच थेट पत्रकार परिषदेत हजर केले. कुलकर्णी यांचे वडीलही आले होते. यावेळी सूरज पोळही उपस्थित होते.