मिरजेतील दोघींना आखाती देशात डांबले
By admin | Published: June 29, 2016 12:04 AM2016-06-29T00:04:24+5:302016-06-29T00:07:04+5:30
नातेवाइकांची तक्रार : बंगालमधील एका महिलेचाही समावेश; अत्याचारपीडितेचा आत्महत्येचा इशारा
मिरज : नोकरीचे आमिष दाखवून मिरजेतील दोन महिलांसह तिघींना आखाती देशात डांबून ठेवण्यात आले आहे. एका महिलेच्या नातेवाइकांनी याबाबत शहर पोलिसांत तक्रार दिली असून, तिची तातडीने सुटका न केल्यास अत्याचारपीडित महिलेने आत्महत्येचा इशारा दिल्याने तिचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत.
मिरजेतील विद्या नामक महिला राधिका लोंढे या एजंट महिलेमार्फत मुंबईतील मुजफ्फर नामक एजंटाच्या संपर्कात आली. लोंढे व मुजफ्फर यांनी सौदी अरेबियामध्ये श्रीमंत व्यक्तीच्या घरात मुले सांभाळण्याचे काम असल्याचे सांगून तेथे नोकरी मिळवून देण्याचे आमिष तिला दाखविले. दरमहा ३० हजार पगाराचे आश्वासन देऊन विद्याला ७ जून रोजी सौदी येथे पाठविले.
तेथे पोहोचल्यानंतर मुले सांभाळण्याऐवजी तिला साफसफाई व स्वच्छतेचे काम असल्याचे सांगून १५ हजार रुपये वेतनावर दररोज बारा ते चौदा तास कामाला जुंपण्यात आले. तिने काम करण्यास नकार देऊन परत पाठविण्याची मागणी केल्याने, तिचा व्हिसा व पासपोर्ट काढून घेऊन तिला मारहाण करण्यात आली. दोन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय भारतात पाठविण्यात येणार नसल्याचे सांगून विद्याला मारहाण करून काम करण्यास भाग पाडण्यात येत आहे.
मिरजेतील रुबिका या तरुणीसही अशाच पद्धतीने चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून फसवून नेण्यात आले आहे. तिलाही परत जाऊ न देता डांबून मारहाण करून साफसफाईची कामे करवून घेण्यात येत आहेत. आणखी एक बंगाली तरुणीही तेथे अडकल्याचे विद्याने मिरजेतील नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी मुंबईतील मुजफ्फर या एजंटाशी संपर्क साधला असता, त्याने तिला परत आणण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केली.
याबाबत शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप करून, आखाती देशात जबरदस्तीने डांबून ठेवलेल्या तरुणीची सुटका करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. आखाती देशात नोकरीसाठी मिरजेतील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने गेल्या असून, त्यांच्या फसवणुकीच्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)