सांगलीत अपघातात दोघे बाप-लेक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:43 AM2019-04-22T10:43:05+5:302019-04-22T10:44:26+5:30
भरधाव मोटारीने दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिल्याने बाप-लेक ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ शुक्रवारी रात्री साडअकरा वाजता हा अपघात झाला. मोटारीचा चालक सागर किसन माळी (वय २४, रा. बस्तवडे, ता. तासगाव) यास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली : भरधाव मोटारीने दोन दुचाकींना पाठीमागून जोराची धडक दिल्याने बाप-लेक ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ शुक्रवारी रात्री साडअकरा वाजता हा अपघात झाला. मोटारीचा चालक सागर किसन माळी (वय २४, रा. बस्तवडे, ता. तासगाव) यास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे.
विक्रम शामलाल रामचंदाणी (३२), त्यांची मुलगी काव्या (४ वर्षे, रा. आंबेडकर रस्ता, क्रांती क्लिनिकजवळ, सीतारामनगर, सांगली) अशी मृत बाप-लेकीची नावे आहेत. जखमींमध्ये मृत रामचंदाणी यांची पत्नी सोनी (२८) तसेच संतोष वासुदेव कुलकर्णी (२८) व विनायक दत्तात्रय जोशी (२७, दोघे रा. इराणी मस्जीदजवळ, जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रामचंदाणी कुटुंब शुक्रवारी सायंकाळी जयसिंगपूर येथे नातेवाईकांच्या घरी कार्यक्रम असल्याने दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीएच-७६३८) गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते अकरा वाजता सांगलीला येत होते. त्याचवेळी संतोष कुलकर्णी व विनायक जोशी दुचाकीवरून (क्र. एमएच १० टीवाय-७११) सांगलीत येत होते. या दोन्ही दुचाकी पुढे-मागे काही अंतरावर होत्या. आकाशवाणी केंद्राजवळ आल्यानंतर पाठीमागून सागर माळी भरधाव मोटारीने (क्र. एमएच ०४ डीबी-४८७१) येत होता. त्याने दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली. यामध्ये रामचंदाणी, त्यांची पत्नी व मुलगी रस्त्यावर उडून पडले.
कुलकर्णी व जोशी दोघेही त्यांच्या दुचाकीवरून खाली पडले. डोक्याला मार लागल्याने रामचंदाणी यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींना तातडीने उपचारार्थ हलविले; पण उपचार सुरू असताना काव्या रामचंदाणी या चिमुरडीचाही मृत्यू झाला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.