रावळगुंडवाडीत दोन्ही पाणी योजना फोल
By admin | Published: May 24, 2017 11:39 PM2017-05-24T23:39:05+5:302017-05-24T23:39:05+5:30
रावळगुंडवाडीत दोन्ही पाणी योजना फोल
जयवंत आदाटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : तालुक्यातील रावळगुंडवाडी गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना आणि जलस्वराज्य योजना याची अंमलबजावणी झाली आहे. परंतु गतवर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही योजना कुचकामी ठरल्या आहेत. सध्या १२ हजार लिटर क्षमतेच्या एका टॅँकरद्वारे रोज तीन खेपा करून गावासह तेथील चार वस्त्यांवर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
रावळगुंडवाडीची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. २५ किलोमीटरवर असलेल्या बिरनाळ साठवण तलावातून टॅँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २००५-०६ या वर्षात शिवकालीन पाणी साठवण योजना अंमलात आणली होती. यावेळी सार्वजनिक इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला होता. त्यासाठी ८० हजार रुपये खर्च करण्यात आले होते. २०११-१२ या वर्षात गावातील सर्व इमारतीवरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यात आले होते. त्यासाठी १४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.
२००८-०९ वर्षात रावळगुंडवाडी गावासाठी जलस्वराज्य योजना मंजूर झाली होती. या योजनेतून गावाच्या दक्षिण बाजूस सुमारे ५०० मीटर अंतरावर १२५ फूट खोल विहीर खोदून त्यातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात होता.
दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे विहिरीतील उद्भव बंद झाला आहे. विहिरीची आणखी खुदाई केल्यानंतर पाणी लागेल या आशेवर ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून विहिरीची खुदाई केली आहे. परंतु पाणी लागले नाही. २००४ चा अपवाद वगळता या गावाला मागील १५ वर्षांत एकदाही टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागला नाही.
शिवकालीन पाणी साठवण योजनेचा गावाला निश्चित स्वरूपात फायदा झाला आहे. गाव टॅँकरमुक्त झाले होते. परंतु गतवर्षी पाऊस कमी पडल्यामुळे यावर्षी टॅँकरची मागणी करावी लागली आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच बसाप्पा सुतार व उपसरपंच आण्णाप्पा हिरगोंड यांनी व्यक्त केली.
सध्या गावाला बिरनाळ साठवण तलावातून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. हे पाणी अशुद्ध आहे, ते शुद्ध केले जात नाही. तलावातून पाणी विद्युत मोटारीद्वारे उचलून टॅँकरमध्ये भरले जाते. तो टॅँकर २५ किलोमीटर अंतरावर नेऊन तेथे त्या पाण्याचे वाटप केले जाते. या पाण्यात टी. सी. एल. मिसळून त्याचे वाटप केले जाते, असा दावा प्र्रशासनाकडून केला जात आहे. परंतु २५ किलोमीटर अंतरावरून सतत ढवळून आलेल्या पाण्यात तात्काळ टीसीएल टाकून ते शुद्ध कसे होणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी चार किलोमीटरवर पायपीट
टॅँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात नाही. अंघोळ व इतर दैनंदिन वापरासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. पिण्यासाठी तीन-चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणून त्याचा उपयोग नागरिक करत आहेत. टॅँकरद्वारे मिळणाऱ्या दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशी भीती नागरिक व्यक्त करत असले तरी, त्याची शक्यता कमी आहे, असा दावा सरपंच बसाप्पा सुतार व उपसरपंच आण्णाप्पा हिरगोंड यांनी केला आहे.