महिला पोलीसपाटीलसह दोघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:36+5:302021-06-04T04:21:36+5:30
विटा : टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथे जाऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी लेंगरे (ता. खानापूर) ...
विटा : टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथे जाऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी लेंगरे (ता. खानापूर) येथील महिला पोलीसपाटील पुष्पा मोहन बोबडे व दीपक पांडुरंग बोबडे (दोघेही रा. लेंगरे) या दोघांना गुरुवारी विटा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
लेंगरे हद्दीत बुधवारी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कचरेवाडी कालव्याच्या बंदिस्त पाइपलाइनचे काम चालू होते. दुपारी कनिष्ठ अभियंता कृष्णत कदम यांच्यासह कामाचे ठेकेदार अभिषेक चैने, कामगार मेहबूब नदाफ, लालसाब नदाफ आणि प्रकाश बारापात्रे असे पोलीस बंदोबस्तामध्ये दुरुस्तीचे काम करत असताना लेंगरेच्या महिला पोलीसपाटील पुष्पा बोबडे या दीपक बोबडे याच्यासोबत तिथे आल्या.
त्यावेळी तेथे चाललेल्या दुरुस्तीच्या कामाशी काही संबंध नसताना त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे कनिष्ठ अभियंता कदम यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या दोघांना अटक केली होती. गुरुवारी दोघांनाही शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. कोळेकर पुढील तपास करीत आहेत.