खोक्यांचे तात्पुरते अन्यत्र पुनर्वसन होणार
By admin | Published: April 17, 2017 11:23 PM2017-04-17T23:23:11+5:302017-04-17T23:23:11+5:30
विश्रामबाग उड्डाण पुलाचा प्रश्न : कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी पुन्हा बैठक
सांगली : विश्रामबाग रेल्वे उड्डाण पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या खोक्यांचे अन्यत्र तात्पुरते पुनर्वसन करण्यासह रस्त्याची शासकीय मोजणी झाल्यानंतर जागा शिल्लक राहिल्यास, आहे त्याचठिकाणी या खोक्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यावर सोमवारी झालेल्या बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. कुपवाड रस्त्यावरील चैत्रबन नाल्यावरील पुनर्वसनाला मात्र महापालिकेने विरोध केला.
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत विश्रामबाग उड्डाण पुलाजवळील खोकीधारकांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. या बैठकीला स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. चव्हाण, वीज वितरण कंपनीचे कट्टी, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे, नगररचनाचे सहाय्यक संचालक दिलीप कदम, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे उपस्थित होते.
मंगळवारच्या बाजाराजवळील महापालिकेच्या खुल्या जागेत तात्पुरते पुनर्वसन करण्यावर बैठकीत चर्चा झाली. पण खोकीधारकांनी या जागेऐवजी चैत्रबन नाल्यावर पुनर्वसनाची मागणी केली. याठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, असा आग्रह खोकीधारकांनी धरला. त्यावर संतोष पाटील म्हणाले की, बसस्थानकाच्या नाल्यावर खोकी उभी केली आहेत. हा नाला स्वच्छही करता येत नाही. पावसाळ्यात या नाल्यातून पाणी पुढे सरकत नाही. झुलेलाल चौक, बसस्थानक पाण्यात जाते. तशीच परिस्थिती चैत्रबन नाल्याची होईल. त्यामुळे नाल्यावर खोक्यांचे पुनर्वसन करू नये.
आमदार गाडगीळ म्हणाले की, खोकीधारकांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे. उड्डाण पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी खोकी हटवावी लागणार आहेत. हा रस्ता शंभरफुटी आहे. उड्डाण पूल, सेवारस्ता व फूटपाथ असे ९४ फूट काम होणार आहे. सहा फुटाची जागा शिल्लक राहील. त्यानंतर या रस्त्याची शासकीय मोजणी करावी लागेल. त्यानंतर शिल्लक जागेत खोकीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करता येईल.
बैठकीत मंगळवारच्या महात्मा गांधी कॉलनीतील आठवडा बाजाराजवळील महापालिकेच्या खुल्या जागेत पुनर्वसन करण्याचा पर्याय समोर आला आहे. पण या जागेविषयी ठोस निर्णय झाला नाही. खोकीधारकांच्या पुनर्वसनासाठी आणखी एक बैठक घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या रस्त्याची मोजणी करण्याचा निर्णय झाला. आमदार गाडगीळ यांनी युद्धपातळीवर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. येत्या दोन ते तीन दिवसात रस्त्याची शासकीय मोजणी करून शिल्लक जागेचा अंदाज घेतला जाईल. त्यानंतर पुनर्वसनाबाबत पुन्हा बैठक होईल, असे आ. गाडगीळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बैठकीसाठी : महापौरांना डावलले
महापालिका हद्दीतील खोक्यांच्या पुनर्वसनाबाबत बोलाविलेल्या बैठकीला महापौर हारुण शिकलगार यांना मात्र डावलण्यात आले. बैठक सुरू झाल्यानंतर आयुक्तांच्या स्वीय सहायकाने महापौरांना दूरध्वनी करून बैठकीला बोलाविले; पण त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर स्वत: आमदार गाडगीळ यांनी त्यांना दूरध्वनी केला. त्यावर शिकलगार यांनी, ’हा प्रोटोकॉल नव्हे. तुम्ही व आम्ही दोघेही लोकप्रतिनिधी आहोत. असा प्रकार आमच्या हातून झाला असता तर आमदार म्हणून तुम्ही बैठकीला आला असता का?’ असा सवाल केला. अखेर आमदार गाडगीळ यांनीही महापौरांशी चर्चा करून खोकी पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाईल, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.