निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 01:31 AM2019-02-07T01:31:00+5:302019-02-07T01:32:04+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी घोट तालुक्याची निर्मिती करावी, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर घोट व परिसरातील जनता सामूहिक बहिष्कार टाकेल, असा इशारा घोट येथे आयोजित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : लोकसभा निवडणुकीपूर्वी घोट तालुक्याची निर्मिती करावी, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर घोट व परिसरातील जनता सामूहिक बहिष्कार टाकेल, असा इशारा घोट येथे आयोजित सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
घोट परिसरात ५० ते ६० गावे येतात. ६० ते ७० किमीचे अंतर पार करून चामोर्शी येथे तालुकास्थळी जावे लागते. घोट तालुक्याची निर्मिती करावी, यासाठी स्थानिक जनतेने मागील २६ वर्षांपासून आंदोलने, मोर्चे, निवेदन याद्वारे पाठपुरावा केला. स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही वेळोवेळी मागणी केली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घोट तालुक्याची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात निवडणूक जिंकल्यानंतर लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा अनुभव घोट परिसरातील जनतेला येत चालला आहे. घोट परिसरातील समस्यांकडेही शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अनेक गावांपर्यंत मूलभूत सोयीसुविधा सुद्धा उपलब्ध झाल्या नाहीत. लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे या परिसरातील गावे विकासापासून कोसो दूर राहिली आहेत. अशा अकार्यक्षम लोकप्रतिनिधींना निवडून देऊन कोणताही उपयोग नाही. त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या विरोधात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
पत्रकार परिषदेला भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हाध्यक्ष तथा घोट तालुका संघर्ष समितीचे अशोक पोरेड्डीवार, जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, सरपंच विनय बारसागडे, पं.स.सदस्य सुरेश कामेलवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते संजय वडेट्टीवार, सुशील शहा, उपसरपंच साईनाथ नेवारे, वसंत दुधबावरे, गुरूदास वैरागडे, ग्रा.पं.सदस्य गिरीश उपाध्ये, परशुराम दुधबावरे, बबन धोडरे, दिनकर लाकडे, बाबुराव भोवरे, बंडू जुआरे, मंसराम पिपरे, किशोर बुराडे, शरद नल्लुवार हजर होते.