नव्या यांत्रिक बोटीपासून ब्रह्मनाळ वंचितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 02:27 PM2019-11-25T14:27:13+5:302019-11-25T14:28:04+5:30
आता गावगाडा पूर्ववत होताच सारी आश्वासने महापुराच्या पाण्यासारखी विरुन गेलीत. गावकºयांनीही झाले-गेले विसरुन स्वत:ला दररोजच्या रामरगाड्याला जुंपून घेतलेय. बळींच्या कुटुंबीयांच्या जखमा मात्र भळभळत्याच आहेत.
सांगली : अॉगस्टमधील प्रलंयकारी महापुरात सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे घडलेल्या दुर्घटनेत १७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. कृष्णाकाठाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेस तीन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप येथील गावकऱ्यांना नवीन बोट मिळालेली नाही. ग्रामस्थांना शंभर लाईफ जॅकेट्स व नवी यांत्रिक बोट हवी आहे, यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे, पण महापुराबरोबर येथील दुर्घटनेचेही गांभीर्य वाहून गेल्याने शासकीय यंत्रणेसह सर्वच स्तरांवर याबाबत उदासिनता दिसून येत आहे.
आॅगस्ट महिन्यात कृष्णा, वारणा व पंचगंगेच्या महापुराने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र विळख्यात घेतला. ८ आॅगस्टला संपूर्ण महाराष्ट्राला हादरवत महापुराने सतराजणांचे प्राण घेतले. होडी उलटून जलसमाधी मिळाली. काळीज हेलावणाºया दुर्घटनेनंतर सहानुभूतीचा महापूर आला. अनेकांनी अनेकप्रकारे हात दिले. आश्वासनेही दिली. वंचित आघाडीने गाव दत्तक घेतल्याचे जाहीर केले. आता गावगाडा पूर्ववत होताच सारी आश्वासने महापुराच्या पाण्यासारखी विरुन गेलीत. गावकºयांनीही झाले-गेले विसरुन स्वत:ला दररोजच्या रामरगाड्याला जुंपून घेतलेय. बळींच्या कुटुंबीयांच्या जखमा मात्र भळभळत्याच आहेत.
दुर्घटनाग्रस्त बोट बेवारस अवस्थेत गावाशेजारी पडून आहे. दुर्घटनेवेळी बंद पडलेल्या मोटारीच्या दुरुस्तीकडेही कोणाचे लक्ष नाही. एक वल्हवण्याची होडी आहे, पण तिच्या वापराचे धारिष्ट्य ग्रामस्थांत सध्या तरी नाही. पूरस्थिती वगळता ग्रामस्थांना होडी अथवा बोटीचा वापर दररोज करावा लागत नाही. शेतक-यांनी कसबे डिग्रज, नांद्रे भागात शेतजमिनी केल्यात. तिकडे जाण्यासाठी नदी ओलांडावी लागते. होडी नसल्याने काहिलीचा वापर करावा लागतो. शासनाने नवी होडी दिल्यास काहिलीचा जीवघेणा प्रवास टळेल, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत शंभर लाईफ जॅकेट्स आणि दोन नव्या यांत्रिकी बोटींचा ठराव ग्रामस्थांनी केला, तो जिल्हा प्रशासनाला पाठवला. पण कोणतीही कार्यवाही न होता तो फाईलबंद झाला. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनीही दोन बोटींचे आश्वासन दिले होते, त्याचीही पूर्तता अद्याप नाही