ब्रह्मनाळमध्ये करणी ! जनावराच्या पिलांचा बळी, चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 03:11 PM2017-10-17T15:11:41+5:302017-10-17T15:21:29+5:30
ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्या रात्री अज्ञात व्यक्तींनी करणीचा प्रकार केला असल्याचे उघडकीस आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिली. म्हसोबा मंदिराजवळ अकरा जनावराच्या पिलांचा बळी देण्यात आला आहे. सोमवार, दि. १६ रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.
भिलवडी , दि. १७ : ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्या रात्री अज्ञात व्यक्तींनी करणीचा प्रकार केला असल्याचे उघडकीस आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिली. म्हसोबा मंदिराजवळ अकरा जनावराच्या पिलांचा बळी देण्यात आला आहे. सोमवार, दि. १६ रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.
गावात निवडणुकीचे जोरदार वातावरण होते. सर्वच राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याने निवडणुकीची रंगतही वाढली होती. अशात गावातील काही राजकीय नेते व समाजकंटकांनी जागृत मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने करणीचा प्रकार केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले.
गावातील म्हसोबा देवालयानजीक अकरा जनावराच्या पिलांचा बळी देऊन काळ्या बाहुल्या, लिंबू असे साहित्य टाकून दिले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार गंभीर असून, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख यांच्याकडे सर्व नागरिक तक्रार देणार असल्याची माहिती संदीप राजोबा यांनी दिली.
मोकाट कुत्र्यांमुळे उलगडा
ब्रह्मनाळ ते खटाव रस्त्यावर दोन्ही गावांच्या शिवेवर म्हसोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ अकरा जनावराच्या पिलांचा बळी देण्यात आला आहे. तसेच काळ्या बाहुल्या, लिंबू, टाचण्या, हळदी-कुंकू, भंडारा टाकण्यात आला आहे.
या बळी दिलेल्या जनावराच्या पिलांच्या मृतदेहांचे अवशेष खाण्याच्या हेतूने गावातील मोकाट कुत्र्यांनी पळवून गावातील मानवी वस्तीत नेले. यावेळी नागरिकांनी काही कुत्र्यांचा पाठलाग करून म्हसोबा देवालय गाठले. त्यावेळी तेथे जनावराचे अवशेष आढळून आल्याने हा करणीचा प्रकार उघडकीस आला.