बहुजनांनी ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य उलथवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:29 AM2018-05-28T00:29:58+5:302018-05-28T00:29:58+5:30
वाटेगाव : बहुजन समाजातील लोकांनी एकत्र येऊन ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य बदलून टाकावे, असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष, राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथून बहुजन क्रांती मोर्चा, परिवर्तन यात्रेचा प्रारंभ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
मेश्राम म्हणाले, कोरेगाव-भीमा येथे भिडे-एकबोटेंनी दंगल घडवून एकसंध बहुजन समाजामध्ये जातीय भावना भडकावून विभाजन करण्याचे षड्यंत्र रचले. ते षड्यंत्र जागरुक बहुजन समाजाने हाणून पाडले. बहुजन समाजाला एकसंध करुन ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात संघर्ष करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाने परिवर्तन यात्रेचे आयोजन केले आहे. तेव्हा बहुजन समाजातील मराठा, ओ.बी.सी., अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जमाती, बलुतेदार, एस.बी.सी., मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, लिंगायत, शीख, जैन आदी समूहातील बांधवांनी आपले हक्क व अधिकार नष्ट होऊ नयेत, म्हणून एकत्र येऊन न्याय्य हक्कासाठी एकीची वज्रमूठ करुन लढा दिला पाहिजे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे म्हणाले, बहुजन समाजातील लोकांनी बहुजन
क्रांती मोर्चाला बळ देऊन संघटना मोठी बनवावी. राज्याच्या ग्रामीण भागात ही परिवर्तन यात्रा मोठ्या प्रमाणात काढण्यात येणार आहे. यावेळी सरपंच सुरेश साठे, पोलीसपाटील संतोष करांडे, ग्रा. पं. सदस्य विनोद जाधव, संजय जाधव, अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्री साठे, नीशा मेश्राम, डॉ. आर. एन. कवठेकर, माया जमदाडे उपस्थित होते. योगेश साठे यांनी प्रास्ताविक केले. शालिग्राम आलामी यांनी आभार मानले.