जिल्ह्यातील साहित्यिकांचे ब्रॅँडिंग करणार
By admin | Published: February 7, 2017 11:17 PM2017-02-07T23:17:38+5:302017-02-07T23:17:38+5:30
शेखर गायकवाड : सांगलीत विज्ञान प्रदर्शन, ग्रंथ महोत्सवास प्रारंभ
सांगली : जिल्ह्यात नामांकित साहित्यिकांची मोठी फळी असूनही प्रसिध्दीपासून दूर असल्यामुळे त्यांची जगाला ओळख झाली नाही. त्यांची जगाला ओळख करून देण्यासाठी सांगली ब्रँडिंगच्या धर्तीवर प्रसिध्द साहित्यिकांचे ब्रॅडिंग करणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि राजमती सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीतील नेमिनाथनगर येथील राजमती भवन येथे मंगळवारी विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी गायकवाड यांच्याहस्ते झाले. सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राजमती सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, नामदेव माळी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय गायकवाड, प्राचार्या मीनाक्षी वाजे उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले की, सांगली जिल्ह्याला ग. दि. माडगूळकर, शंकरराव खरात, चारूता सागर यांच्यापासून ते तारा भवाळकर यांच्यापर्यंत फार मोठ्या साहित्यिकांचा इतिहास आहे. या साहित्यिकांच्या साहित्याची जगाला ओळख करून देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या सर्वच साहित्यिकांची जगाला परिचय करून देण्यासाठी त्यांचेही ब्रॅँडिंग करणार आहे. त्यादृष्टीने आमचे कामही सुरू आहे. या साहित्यिकांची सध्या तरुण पिढीलाही ओळख होण्याची गरज आहे. आजच्या तरुणांमध्ये वाचन कमी होत चालले असून, ही चिंतेची बाब आहे. याचा शिक्षक व पालकांसह सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी वाचन संस्कृती रुजविल्यास निश्चित भविष्यातील तरुण पिढी सक्षम होण्यास मदत होईल.
डॉ. भवाळकर म्हणाल्या की, मुलांना प्रश्न आणि उत्तर याच्यातून शिक्षकांनी बाहेर काढले पाहिजे. उत्तर तर त्यांना सांगूच नका. प्रश्न आणि उत्तरातून विद्यार्थ्यांना पदव्या मिळतील; पण त्यांच्या आयुष्यात ते सक्षमपणे उभे राहू शकणार नाहीत. जगाच्या पाठीवर विद्यार्थ्यांना सक्षम उभे करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची गरज आहे.
प्रा. महाजन म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये पुस्तके वाचण्याची गोडीही शिक्षकांनी लावली पाहिजे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी प्रास्ताविक केले. कक्ष अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी आभार मानले. डॉ. शोभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)