तासगावात साडेतीन कोटींच्या कामांना सत्ताधाºयांचा ब्रेक उदासीन कारभार : प्रशासकीय मंजुरीनंतरही निविदा प्रक्रिया रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:33 AM2018-01-25T00:33:11+5:302018-01-25T00:35:14+5:30
तासगाव : तासगाव नगरपालिकेकडे शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही सत्ताधाऱ्यांच्या उदासीन
दत्ता पाटील ।
तासगाव : तासगाव नगरपालिकेकडे शहरातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही सत्ताधाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी पडून आहे. चार महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरी असूनही निविदा प्रक्रिया राबवली जात नसल्याने, ठेकेदारीच्या उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे.
तासगाव नगरपालिकेवर खासदार संजयकाका पाटील यांची वर्चस्व मिळवल्यानंतर, केंद्र आणि राज्य शासनाकडे वजन वापरुन संजयकाकांनी तासगाव पालिकेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला. नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातूनही तासगाव पालिकेला निधी उपलब्ध करुन दिला. सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला काही दिवस पालिकेतील सत्ताधाºयांनी विकासकामांचा धडाका दाखवला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पालिकेत निधी शिल्लक असूनही कामे केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
तासगाव नगरपालिकेकडे सुमारे सात कोटींपेक्षा जास्त कामे मंजूर आहेत. यापैकी बहुतांश कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. सुमारे साडेतीन कोटींच्या कामांची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. यामध्ये नगरोत्थान अभियान, दलितेत्तर अनुदान, पाणी पुरवठा योजनेचे अनुदान, नावीन्यपूर्ण योजनेचे अनुदान, जिल्हा नियोजन समितीचा निधी यासह अन्य विभागांकडील कामांचा समावेश आहे.
गेल्या चार महिन्यांपासून निधी असूनही सत्ताधाऱ्यांनी निविदा प्रक्रिया राबवलेली नाही. त्यामुळे सत्ताधाºयांच्या या कारभाराची शहरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
यापूर्वी झालेल्या कामांवरून पालिकेतील कारभाऱ्यांत कुरघोड्या सुरू होत्या. अनेकदा त्या जाहीरपणे चव्हाट्यावर आल्या होत्या. या कुरघोड्या आणि टक्केवारीची किनार या कामांना असल्यामुळेच कामे थांबवण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. कामे थांबवल्यामुळे शिल्लक निधी शासनाकडे परत जाण्याची नामुष्की सत्ताधाºयांवर ओढावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिल्लक निधीची : नामुष्की
तासगाव नगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या साडेतीन कोटींच्या कामांसह सुमारे सात कोटींपर्यंत अखर्चित निधी तासगाव पालिकेकडे असल्याचे बोलले जात आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार अखर्चित निधी शासनाकडून परत घेतला जाणार आहे. त्यामुळे अखर्चित निधी परत जाण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांकडून ३१ तारखेला होणाºया सभेत शासनाकडे शिल्लक निधी खर्च करण्यास मुदतवाढ मागण्याचा ठराव अजेंड्यावर घेण्यात आला आहे.
ठेकेदारीचा वादग्रस्त कारभार
तासगाव नगरपालिकेत सत्ता कोणात्याही गटाची असली तरी, नगरसेवक आणि ठेकेदारीचा कारभार वादग्रस्त राहिला आहे. सत्तेतील काही नगरसेवकांचा अपवाद वगळता, त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ठेकेदारीतील इंटरेस्ट तासगावकरांपासून लपून राहिलेला नाही. कोणाच्या प्रभागातील काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे? कोणते काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे? हे ठरवण्यावरुनही अनेकदा धुसफूस झाली. होती. त्यामुळेच या कामांना ब्रेक दिल्याची चर्चा आहे.