‘मिरज मेडिकल’च्या लाचखोर प्रशासकीय अधिकाऱ्यास अटक
By Admin | Published: May 28, 2016 12:18 AM2016-05-28T00:18:55+5:302016-05-28T00:52:25+5:30
पंधरा हजारांची रक्कम : सेवा पुस्तकाच्या प्रतीसाठी हेलपाटे
मिरज : मिरजेतील शासकीय वैद्यकीय महा-विद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला शुक्रवारी १५ हजारांची लाच स्वीकारताना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली.
संजय रमण वाघमारे (वय ५४, रा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवासस्थान, मिरज, मूळ रा. साई विघ्नहर्ता अपार्टमेंट, कामोठा, नवी मुंबई) असे त्याचे नाव आहे. कर्मचाऱ्याला सेवा पुस्तकाची प्रत देण्यासाठी व कर्जाकरिता अर्जावर सही-शिक्क्यासाठी वाघमारे याने ही लाच मागितली होती.
वैद्यकीय महाविद्यालयातील ग्रंथालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून एका कर्मचाऱ्याची अनुकंपा तत्त्वावर दोन वर्षांपूर्वी नियुक्ती झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने महाविद्यालयाचा प्रशासकीय अधिकारी संजय वाघमारे याच्याकडे सेवा पुस्तकाची व सॅलरी अर्नर्स सोसायटीकडून सभासद कर्ज घेण्यासाठी अर्जावर सही-शिक्क्याची मागणी केली होती. मात्र, गेले आठ महिने त्याचे सेवा पुस्तक देण्यास वाघमारे टाळाटाळ करीत होता. याबाबत या कर्मचाऱ्याने चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय व्हनमाने यांना सांगितल्यानंतर, व्हनमाने यांनी वाघमारे याची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक तयार करून देण्याबाबत विनंती केली. वाघमारे याने सेवा पुस्तक तयार करण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीने हा व्यवहार १५ हजारांत ठरला. याबाबत कर्मचारी संघटनेचे व्हनमाने व सुभाष थोरात यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. (वार्ताहर)