लाचखोर मोजणीदार जाळ्यात
By Admin | Published: July 22, 2015 12:44 AM2015-07-22T00:44:08+5:302015-07-22T00:45:25+5:30
जतमध्ये कारवाई : दहा हजारांची मागणी; रंगेहात पकडले
सांगली : शेतजमिनीत मोजणी केल्याप्रमाणे हद्दीचा नकाशा देण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना जत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदारास रंगेहात पकडण्यात आले. बळीराम भैरवनाथ गायकवाड (वय ५१, रा. शाहूनगर, काकडे प्लॉट, उस्मानाबाद, सध्या ग्रामीण पोलीस ठाण्यामागे, शासकीय निवासस्थान, मिरज) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सकाळी सव्वाअकरा वाजता जतच्या बसस्थानकावर ही कारवाई केली. जतमधील तक्रारदाराने स्वत:च्या शेतजमिनीत भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करून घेतली होती. मोजणीप्रमाणे हद्दीच्या ज्या खुणा करण्यात आल्या होत्या, त्यानुसार त्यांना हद्दीच्या खुणांचा नकाशा पाहिजे होता. यासाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात संपर्क साधला. नकाशा देण्याचे काम मोजणीदार गायकवाड याच्याकडे होते. यासाठी त्याने दहा हजारांची मागणी केली होती. पैसे दिले तरच नकाशा देणार, असे त्याने सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने ७ जुलैरोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गायकवाडविरोधात तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची चौकशी शहानिशा केली असता गायकवाड याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. (प्रतिनिधी)