Sangli: अंगणवाडी सेविकेच्या पदोन्नतीसाठी लाचखोरी, तासगावात पंचायत समितीत भ्रष्टाचार चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 06:19 PM2024-10-11T18:19:03+5:302024-10-11T18:19:37+5:30
दत्ता पाटील तासगाव : तासगाव तालुक्यात ११ ठिकाणी अंगणवाडीतील पात्र मदतनिसांना सेविकापदी नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, ही पदोन्नती ...
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव तालुक्यात ११ ठिकाणी अंगणवाडीतील पात्र मदतनिसांना सेविकापदी नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, ही पदोन्नती देताना तासगाव पंचायत समितीतील बाल विकास प्रकल्पातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्रत्येकी दहा हजार रुपये लाच घेतल्याची चर्चा आहे. जिल्हास्तरावर ही रक्कम द्यावी लागणार असल्याचे सांगून ही लाच घेण्यात आली. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या मदतनिसांकडून लाच घेतल्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
शासनाने दोन वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीला स्थगिती दिली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, त्यामध्ये अतिरिक्त गुणांकन सवलतीत मराठा समाज लाभापासून वंचित राहत असल्याने ही भरती स्थगित करण्याचा निर्णय झाला. नवीन अंगणवाडी मदतनीस भरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याच वेळी अंगणवाडीतील पात्र मदतनीस यांना सेविका पदावर थेट नियुक्तीचा निर्णय २७ फेब्रुवारी २०२४ ला शासनाने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश १० सप्टेंबर रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले होते.
शासन निर्णयानुसार तासगाव तालुक्यातील बाल विकास प्रकल्पांतर्गत रिक्त असणाऱ्या अंगणवाडी सेविका या पदासाठी पात्र असलेल्या मदतनिसांची बैठक घेण्यात आली. पात्र असणाऱ्या मदतनिसांकडून कागदपत्रांची पूर्तता आणि पडताळणी केली. त्यानंतर तालुक्यातील ११ अंगणवाड्यांमध्ये पात्र मदतनीस यांची सेविका म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली. २८ सप्टेंबर रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले.
अशी झाली लाचखोरी..
नियुक्तीची सर्व प्रक्रिया शासन आदेशानुसार झाली. मात्र तरीही तासगाव पंचायत समितीतील बाल विकास प्रकल्पातील काही अधिकाऱ्यांनी पदोन्नती करताना प्रत्येकी दहा हजार रुपयांची लाच घेतली. जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही रक्कम द्यावी लागणार आहे, असा निरोप काही पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून देण्यात आला. त्यामुळे अपवाद वगळता नियुक्ती झालेल्या सर्व अंगणवाडी सेविकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये लाच वरिष्ठांना दिल्याची चर्चा पंचायत समितीत आणि अंगणवाडी सेविकांत सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
अंगणवाडी सेविकापदाची पात्रता..
अंगणवाडी मदतनीस म्हणून किमान दोन वर्षे अनुभव. तसेच, ऑगस्ट २०२२ पूर्वी अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती असल्यास दहावी उत्तीर्णची अट; तर ऑगस्ट २०२२ नंतर अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती असल्यास बारावी उत्तीर्णची अट.
अंगणवाडी मदतनीस या पदावरून सेविका या पदावर शासन निर्णयानुसार रीतसर नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोणतीही लाचखोरी झालेली नाही. सर्व नियुक्त्या पारदर्शी पद्धतीने केलेल्या आहेत. -मनीषा साळुंखे, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती, तासगाव.