लाचखोर सपना घोळवेसह निरीक्षकास पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 08:32 PM2024-06-06T20:32:43+5:302024-06-06T20:32:58+5:30

साताऱ्यातील निवासस्थानी मिळाली साडे चार लाख रोकड

Bribery Sapna Gholve along with inspector in police custody | लाचखोर सपना घोळवेसह निरीक्षकास पोलिस कोठडी

लाचखोर सपना घोळवेसह निरीक्षकास पोलिस कोठडी

घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शैक्षणिक संस्थेच्या मंजूर अनुदानाचा धनादेश देण्यासाठी एक लाख रूपयाची लाच घेताना अटक केलेल्या समाज कल्याण अधिकारी सपना सुखदेव घोळवे (वय ४०, रा. सातारा) आणि लाचेच्या मागणीबद्दल अटक केलेल्या निरीक्षक दीपक भगवान पाटील (वय ३६, रा. पाटील वाडा हॉटेलमागे, सांगली) या दोघांना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान लाचेच्या कारवाईनंतर घोळवे यांच्या सातारा येथील निवासस्थानाच्या झडतीमध्ये साडे चार लाखाची रोकड जप्त केली.

अधिक माहिती अशी, सपना घोळवे या सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी आहेत. त्यांच्याकडे सांगलीत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार चार महिन्यापासून आहे. एका शैक्षणिक संस्थेस ५९ लाख ४० हजाराचे अनुदान मंजूर होते. त्याचा पहिला हप्ता जमा झाला आहे. पहिला मिळालेला हप्ता आणि दुसऱ्या जमा होणाऱ्या हप्त्याचे मिळून दहा टक्के प्रमाणे सहा लाखाची लाच मागितली होती. याबाबत संस्थेच्या पदाधिकारी यांनी तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत पाच लाखाची नंतर चर्चेंअंती अडीच लाखाची लाच मागून पहिला हप्ता तातडीने एक लाख रूपये आणण्यास घोळवे यांनी सांगितले. त्याप्रमाणे एक लाखाची लाच घेताना घोळवे यांना अटक केली. तर तक्रारदाराकडून आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश काढण्यासाठी समाज कल्याण निरीक्षक दिपक पाटील यानेही दहा हजाराची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यालाही अटक केली.

अटकेतील दोघांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखाेर दोघांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. भदगले यांनी दोघांना सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान लाचखोर दोघांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली. यावेळी सातारा येथील घोळवे यांच्या निवासस्थानी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेल्या झडतीत साडे चार लाखाची रोकड मिळाली. तसेच दीपक पाटीलच्या सांगलीतील घराचीही झडती घेण्यात आली. पोलिस निरीक्षक विनायक भिलारे तपास करत आहेत.
.......

विजय चौधरी यांनी घेतली माहिती-
लाचखोर सपना घोळवे या वर्ग एकच्या अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध केेलेल्या कारवाईची माहिती घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर अधीक्षक, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी सांगलीत आले होते. त्यांनी सांगलीतील अधिकाऱ्यांकडून कारवाईची माहिती घेत तपासाबाबत सूचना केल्या.

Web Title: Bribery Sapna Gholve along with inspector in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली