तासगाव पंचायत समितीत लाचखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:38 PM2020-01-10T19:38:17+5:302020-01-10T19:40:20+5:30

तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची लाचखोरी चर्चेत आली आहे. तळागाळात काम करणाऱ्या महिलांना मिळालेल्या मानधनाची मागणी करून, उद्योगधंद्यासाठी महिला बचत गटांनी काढलेल्या कर्जातील पैसे उसने घेऊन, मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करून, मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

Bribery in the Tasgaon Panchayat Committee | तासगाव पंचायत समितीत लाचखोरी

तासगाव पंचायत समितीत लाचखोरी

googlenewsNext
ठळक मुद्देतासगाव पंचायत समितीत लाचखोरी अधिकाराचा गैरवापर करून, मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी

तासगाव : तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची लाचखोरी चर्चेत आली आहे. तळागाळात काम करणाऱ्या महिलांना मिळालेल्या मानधनाची मागणी करून, उद्योगधंद्यासाठी महिला बचत गटांनी काढलेल्या कर्जातील पैसे उसने घेऊन, मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करून, मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून, त्यांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी मोठी यंत्रणा राबवली जाते. तासगाव पंचायत समितीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित आहेत.

तालुक्यात दोन हजारपेक्षा जास्त बचत गटांचे जाळे आहे. महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक, जिल्हा परिषद गटनिहाय प्रत्येकी एक प्रभाग समन्वयक, गावपातळीवर प्रत्येकी दहा बचत गटांसाठी एक समूह संसाधन व्यक्ती अशा पध्दतीने तळागाळापर्यंत बचत गटांची चळवळ सक्षम करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे.

मात्र तासगावात यंत्रणेला अंधाधुंद कारभाराची कीड लागली आहे. गावात मानधन तत्त्वावर समूह संसाधन व्यक्ती म्हणून अठराशे ते तीन हजार अशा तुटपुंज्या मानधनावर सामान्य महिला काम करत आहेत. मात्र त्यांना मनमानी पध्दतीने वागणूक देऊन, त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मानधनावरच डोळा ठेवून काम करणारे काही अधिकारी असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

तालुक्यातील काही महिला वर्षभरापूर्वी समूह संसाधन व्यक्ती म्हणून नव्याने काम करू लागल्या होत्या. या महिलांना पहिल्यांदा सात महिन्यांचे १२ हजार ६०० रुपयांचे मानधन मिळाले. हे मानधन मिळाल्यापासून पंचायत समितीतील प्रभाग समन्वयकांनी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी संबंधित महिलांनी पैसे खर्च झाल्याचे सांगून टाळाटाळ केली.

पुन्हा काही दिवसांनंतर १२ डिसेंबरला ९ हजार ६०० रुपयांचे मानधन जमा झाले.  त्यावेळी पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांनी या महिलांमागे प्रत्येकी दहा हजार रुपयांसाठी तगादा लावला. तुमचे मानधन जमा झाले आहे, भेटायला या, असे सांगून भेटायला बोलावले. भेट घेतल्यानंतर तुमचे काम दिसत नाही. तरीही तुम्हाला मानधन मिळाले आहे. तुमच्यामुळे माझा पगार मिळालेला नाही. वरिष्ठ कार्यालयाला यातील पैसे दिले आहेत. तुम्हाला काम नसतानाही पगार दिल्यामुळे हे पैसे द्यावे लागतात, अशी तंबी देऊन महिलांकडे पैशाची मागणी केली.

या महिलांनी संबंधित अधिकाऱ्याची तक्रार तालुका अभियान व्यवस्थापकांकडे केली. त्यानंतर व्यवस्थापकांनी संबंधित महिलांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. त्यानुुसार सहा समूह संसाधन महिलांनी लेखी तक्रार सादर केली.
तक्रार दिल्यानंतर तासाभरातच त्यातील काही महिलांवर दबाव आणल्याने तक्रार नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली.

आठवडाभरातच संबंधित अधिकाऱ्यांकडून दबाव येऊ लागल्याने, तक्रारदार महिलांनी धास्ती घेतली. त्यातील दोन महिलांनी समूह संसाधान व्यक्ती पदाचा राजीनामा गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला. तासगाव पंचायत समितीतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील ही लाचखोरी बंद करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.
 

Web Title: Bribery in the Tasgaon Panchayat Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.