विटा पालिका मिळविणार प्लास्टिक कचऱ्यातून पैसा : पेव्हिंग ब्लॉकची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:49 AM2019-12-13T00:49:30+5:302019-12-13T00:52:24+5:30
हा प्रयोग यशस्वी झाला असून, प्लास्टिकपासून तयार होणारे पेव्हिंग ब्लॉक नागरिकांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे त्यापासून नगरपालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करणारी विटा पालिका जिल्ह्यातील पहिली ठरली आहे.
विटा : विटा शहरात प्रथमच टाकाऊ, खराब प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉकचे व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला असून, या प्रकल्पास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
शहरात नगरपरिषद दैनंदिन घंटागाडीतून ओला व सुका कचरा विलगीकरण करून घेत आहे. त्यासोबतच प्लास्टिक दररोज वेगळे संकलित केले जाते. या प्लास्टिक कचºयापासून पालिकेचे कर्मचारी घनकचरा भूमीवर पेव्हिंग ब्लॉक तयार करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून याबाबत प्रयत्न चालू आहेत.
हा प्रयोग यशस्वी झाला असून, प्लास्टिकपासून तयार होणारे पेव्हिंग ब्लॉक नागरिकांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे त्यापासून नगरपालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करणारी विटा पालिका जिल्ह्यातील पहिली ठरली आहे.
समस्या संपविण्यात यश
प्लास्टिक मानवी आरोग्यास व पर्यावरणास घातक ठरत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात सर्वप्रथम प्लास्टिक बंदी यशस्वीपणे राबविली आहे. संकलित झालेल्या प्लास्टिकचे प्रकारानुसार व आकारानुसार वर्गीकरण करून त्यावर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया करून पेव्हिंग ब्लॉकच्या विटा तयार केल्या आहेत. ही समस्या कायमची संपविण्यात पालिकेला यश आल्याचे नगराध्यक्षा सौ. प्रतिभा पाटील यांनी सांगितले.
नगरपालिकेचा अद्ययावत प्रकल्प
स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये विटा शहर पश्चिम भारतात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे. यास पूरक प्रकल्प निर्मिती पालिकेने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून घनकचरा भूमीवर प्लास्टिकवर प्रक्रिया करणारा प्रकल्प साकारला असून, यात तयार होणाऱ्या उत्पादनास उच्चांकी मागणी असल्याचे मत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केले.
नगरपालिकेच्या उत्पन्नात भर : सर्व प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करून पेव्हिंग ब्लॉक बनविण्याची क्षमता आम्ही निर्माण केली आहे. त्यातून नगरपरिषदेला उत्पन्नाचा आणखी एक स्रोत निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी दिली.