लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीतील नवरीस पुण्यात अटक, इस्लामपूर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 04:12 PM2023-02-15T16:12:13+5:302023-02-15T16:12:56+5:30
नातेवाईक आजारी असल्याचे खोटे सांगत तिने तरुणाच्या घरातून पोबारा केला.
इस्लामपूर : लग्न लावून देत बिरणवाडी (ता. तासगाव) येथील तरुणाला दीड लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील नवरी मुलगी अर्चना मास्टर सावंत (२४, कुंजीरवाडी, पुणे) हिला इस्लामपूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. टोळीतील एका महिलेस यापूर्वीच अटक केली आहे, तर वाळव्याची मुख्य संशयित महिला परागंदा झाली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत घडली. पोलिसांनी या घटनेतील मणीमंगळसूत्र जप्त केले आहे.
ज्योती महादेव लोंढे (वय ३८, वाघोली-पुणे) असे यापूर्वीच अटक केलेल्या महिलेचे नाव असून, आता इस्लामपूर पोलिसांनी पुण्यात जाऊन अर्चना मास्टर सावंत (२४, कुंजीरवाडी, पुणे) हिला अटक केली आहे. बेबीजान बाबू शेख (वाळवा) परागंदा झाली आहे. अर्चना सावंतला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी दिली.
बिरणवाडीच्या ३१ वर्षीय तरुणाचे लग्न जुळवून देण्यासाठी बेबीजान शेख हिने वाघोली येथील ज्योती लोंढे हिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तिघींनी संगनमत करत अर्चनाला मुलगी म्हणून दाखविण्याचा कार्यक्रम वाघोली येथे केला. फिर्यादीचा विश्वास संपादन करत अर्चनाला तरुणाने पसंत केल्यावर लोंढे आणि शेख या दोघींनी तरुणाकडून एक लाख ५० हजार रुपये लग्न लावून देण्यासाठी घेतले.
त्यानंतर अर्चना काही दिवस तरुणासोबत राहिली. नातेवाईक आजारी असल्याचे खोटे सांगत तिने तरुणाच्या घरातून पोबारा केला. ती पुन्हा परतलीच नाही. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने इस्लामपूर पोलिसांत २१ डिसेंबरला फिर्याद दिली.