आमणापूर-येळावी रस्त्यावरील पूल खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:01+5:302020-12-27T04:20:01+5:30
भिलवडी : पलूस आणि तासगाव तालुक्यांना जोडणाऱ्या आमणापूर-येळावी रस्त्यावरील सिडीवर्क पूल खचला आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक ...
भिलवडी : पलूस आणि तासगाव तालुक्यांना जोडणाऱ्या आमणापूर-येळावी रस्त्यावरील सिडीवर्क पूल खचला आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.
रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. हा रस्ता करून एक वर्ष होण्यापूर्वी जागोजागी खचला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डांबर, खडी उखडून खड्डे पडले आहेत; तर गोरड मळा येथे असणाऱ्या निचरा चरीवरील सिडीवर्क पुलाचे काम वर्षानंतरही अपूर्ण आहे.
रात्री-अपरात्री येणाऱ्या वाहनांना हा पुलाचा भाग लक्षात येत नसल्याने रोज मोठे अपघात होत आहेत. शिवाय हा पूल चारीही बाजूंनी खचू लागला आहे.
पुलावर पडलेला एक फूट व्यासाचा खड्डा चुकविताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. रस्ता करून वर्ष होत आले तरीही सिडीवर्क बांधण्याकडे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करीत असल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. सध्या उसाचा हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक, रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी मुरूम वाहतूक अशी अवजड वाहने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी, नोकरदार, शालेय विद्यार्थी, महिला, नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तरी हा सिडीवर्क पूल तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी नेते ज्ञानदेव गोरड, सांगली जिल्हा सुधार समितीचे कृष्णात पाटील यांनी केली आहे.
फोटो-२६भिलवडी१
फोटो ओळ - आमणापूर-येळावी रस्त्यावरील पूल खचला आहे.