सांगली जिल्ह्यातील पूल, बंधारे पाण्याखाली; पावसाचा जोर कायम, वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:28 PM2021-07-22T12:28:00+5:302021-07-22T12:28:16+5:30
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, तर अन्य तालुक्यांमध्ये संततधार सुरु आहे.
सांगली : पावसाच्या जोरदार सरींनी सांगली जिल्ह्याला झोडपले असून नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे. वारणा नदीवरील काही बंधारे, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, तर अन्य तालुक्यांमध्ये संततधार सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह शिराळा तालुक्यातील मुसळधार पाऊस सुरु असून धरणातून विसर्गही सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीवरील मांगले-कांदे पूल, ऐतवडे खुर्द-निलेवाडी पूल, कणेगाव ते भरतवाडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. त्यामुळे कृष्णा नदीवरील पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा, नागठाणे, शिरगाव, नागराळे या गावांचा संपर्क तुटला आहे. कोयना धरणातून अद्याप विसर्ग सुरु नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग सुरु होऊन कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते.