ब्रिटिशांची दलाली करणाऱ्यांना सत्तेवरून हटवू

By admin | Published: February 19, 2016 12:14 AM2016-02-19T00:14:53+5:302016-02-19T00:16:19+5:30

मोहन प्रकाश : सांगलीत कॉँग्रेसचा राज्यव्यापी एल्गार मेळावा; शेतकरी, जनतेवर शासनाकडून अन्याय

The British should break the brokerage from power | ब्रिटिशांची दलाली करणाऱ्यांना सत्तेवरून हटवू

ब्रिटिशांची दलाली करणाऱ्यांना सत्तेवरून हटवू

Next

सांगली : पारतंत्र्यात ज्यांनी ब्रिटिशांची दलाली केली, त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार देशात आणि महाराष्ट्रात आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या या इंग्रजांच्या दलालांना सत्तेवरून हाकलून लावू, असा इशारा कॉँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी सांगलीत दिला.
येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर कॉँग्रेसचा ‘एल्गार मेळावा’ पार पडला. यावेळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. पतंगराव कदम, आ. सतेज पाटील उपस्थित होते. मोहन प्रकाश पुढे म्हणाले की, ब्रिटिशांच्या राजवटीतही स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्यांबरोबर हे लोक नव्हते. त्यांनी त्यावेळी ब्रिटिशांची दलाली केली. आता सत्तेत हेच लोक आल्याने त्यांना जनतेच्या सुख-दु:खाशी देणे-घेणे नाही. ब्रिटिशांना हाकलून लावणाऱ्या कॉँग्रेसलाही आता पाहायचे आहे की, ब्रिटिशांच्या दलालांमध्ये किती दम आहे. आम्ही त्यांना ब्रिटिशांप्रमाणे सत्तेवरून हटवू.
दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी करून अमिताभ बच्चन आणि हेमामालीनीच्या नृत्यावर हे सरकार पैसे उधळत आहे. या सरकारला देशातील प्रश्नांचे भान राहिलेले नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होऊनही सरकार शांत आहे. असे सरकार फार काळ देशात आणि राज्यांमध्ये राहणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अशोक चव्हाण म्हणाले की, हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांची खाती नाहीत म्हणून त्यांना मदत देण्यास नकार देण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर टिंगलटवाळीसुद्धा केली जात आहे. अशा कृतीतून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा उद्योग फडणवीस सरकार करीत आहे. राज्यातील चारा छावण्या बंद केल्या, तर राज्यभर आम्ही तीव्र आंदोलन करू. मोजक्या उद्योजकांनाच सांभाळण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. आदिवासी आणि दलितांच्या जमिनीही गिळंकृत करून त्या उद्योजकांच्या घशात घातल्या जात आहेत. सरकारला कारभार करण्यासाठी दिलेली ‘डेडलाईन’ आता संपलेली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून शहरी भागावरच लक्ष केंद्रीत करण्याचे काम भाजप करीत आहे. आम्हाला दुष्काळाचे राजकारण करायचे नाही, पण शेतकरी आणि सर्वसामान्य जनता अडचणीत येत असेल, तर आम्ही विरोधक म्हणून सरकारला जाब विचारू. यावेळी आ. सतेज पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, महापौर हारुण शिकलगार यांची भाषणे केली.
यावेळी आ. आनंदराव पाटील, पी. एन. पाटील, माजी आमदार उमाजी सनमडीकर, सदाशिवराव पाटील, हाफिज धत्तुरे, प्रकाश आवाडे, जयश्रीताई पाटील, उपमहापौर विजय घाडगे, पक्ष निरीक्षक विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

वसंतदादांनी या राज्याचे नेतृत्व करून विकासाला एक नवी दिशा दिली आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दीचे कार्यक्रम राज्यभर मोठ्या प्रमाणात प्रदेश काँग्रेस करेल, अशी घोषणा अशोक चव्हाण यांनी यावेळी केली.
मंत्र्यांना नाही खात्री...
राज्यातील सत्तेत आलेल्या भाजप सरकारमधील मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांनाही अजून आपण मंत्री झालो आहोत, याची खात्री वाटत नाही. वारंवार ते चिमटे काढून स्वत:ला विचारताहेत, असा टोमणा मोहन प्रकाश यांनी मारल्यानंतर उपस्थितांत हशा पिकला.


गोपाळ शेट्टींचा निषेध
आत्महत्या म्हणजे आता फॅशन आणि ट्रेंड झालेला आहे, असे मत व्यक्त करणाऱ्या भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांचा काँग्रेस नेत्यांनी निषेध केला. ही फॅशन असेल तर शेट्टी यांनीही ती अंगिकारावी, असा सल्ला मोहन प्रकाश यांनी दिला. ‘अरे गोप्या तुला हे शोभतं का?’, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला, तर शेट्टी यांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

केविलवाणा मुख्यमंत्री पाहिला नाही
अधिकारी आपले काहीच ऐकत नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. अधिकारी ऐकत नसल्याचे सांगणारा इतका केविलवाणा मुख्यमंत्री आपण कधीही पाहिला नाही, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

Web Title: The British should break the brokerage from power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.