जिल्हा बँकेच्या भरतीवर दलालांचा डोळा
By admin | Published: November 5, 2015 10:56 PM2015-11-05T22:56:06+5:302015-11-05T23:55:34+5:30
तरुणांना आमिष : भरतीला अद्याप शासनाची मंजुरी नाही, फसवणुकीची शक्यता
सांगली : नव्या आकृतीबंधानुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ५३0 कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. अद्याप या भरतीला मंजुरी मिळाली नसताना, जिल्ह्यातील काही भामट्या दलालांनी आमिष दाखवून तरुणांना लुटण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे या भरतीवरून तरुणांची फसवणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा बँकेला रिक्त पदांच्या भरतीची गरज वारंवार भासत आहे. एक हजार कर्मचाऱ्यांच्या जोरावर बँकेचा कारभार सुरू आहे. सर्वात जास्त उलाढाल असणाऱ्या या बँकेचा गाडा कमी कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. अनेक नव्या योजना व उलाढाल वाढीच्यादृष्टीने जादा कर्मचाऱ्यांची गरज निर्माण झाली होती. रिक्त पदांचा विचार करता, बँकेला १ हजार ४0४ पदांचा आकृतीबंध अपेक्षित होता. प्रत्यक्षात हा आकृतीबंध आता १ हजार ५३0 पर्यंत गेला आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा चांगला आकृतीबंध तयार झाला. हा प्रस्ताव आता सहायक आयुक्त तसेच नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. भरतीसाठी केवळ प्रस्ताव गेल्यानंतर भरती होणार असल्याची अफवा पसरवून जिल्ह्यातील काही दलालांनी गरजू तरुणांवर जाळे टाकले आहे. या जाळ्यात काहीजण अडकण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँकेत वशिला असल्याचे भासवून हे जाळे टाकले जात आहे. वास्तविक शासनाच्या यादीतील अधिकृत कंपनीमार्फत पारदर्शीपणाने भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याने वशिल्याचा कोणताही संबंध याठिकाणी येत नाही. तरीही काही गरजू तरुण अशा दलालांच्या अफवांवर विश्वास ठेवून त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करण्यास सरसावले आहेत. बँकेच्या एका संचालकालाही खुद्द या गोष्टीचा अनुभव आला. व्यवहार करण्याच्या तयारीत असलेल्या एका युवकाला वेळीच सावध केल्याने त्याची फसगत टळली. तरीही दलालांची टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. गरजू तरुणांचा शोध घेऊन त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी दलाल प्रयत्नशील आहेत.
जिल्हा बँकेतील रिक्त पदांच्या भरतीची चर्चा गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. प्रशासकांच्या कालावधितही यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झाले. पण प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला मंजुरी मिळालीच नाही. आता संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर नाबार्डने नवा आकृतिबंधच जाहीर केल्याने, त्यानुसार पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गत आठवड्यात हा प्रस्ताव सहकार विभाग व नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला शासन मंजुरीची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)
तांत्रिक पदे वाढवण्यात आली
नव्याने आकृतीबंधात सॉफ्टवेअर व हार्डवेअर इंजिनिअर्सची प्रत्येकी दोन पदे, तसेच अन्य बऱ्याच तांत्रिक पदांचा समावेश यात झाला आहे. बँकेकडील खेळते भांडवल, शाखानिहाय उलाढाल व खेळते भांडवल यावर पदांचा आकृतिबंध अवलंबून आहे. जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती, उलाढाल चांगली असल्याने आकृतिबंधही तितकाच सक्षम झाला आहे. नव्या पदांच्या भरतीस मंजुरी मिळाल्यानंतर बँकेच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मंजुरीला किती कालावधी लागेल, हे अद्याप सांगता येत नाही.
दराचाही गवगवा सुरु
जिल्हा बँकेतील एका पदाच्या भरतीसाठी ९ ते १0 लाख रुपये द्यावे लागतील, असे काही दलाल सांगत आहेत. मोठ्या पदांच्या भरतीसाठी १४ ते १५ लाख रुपये दर दलालांनीच काढला आहे. म्हणजेच तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा डाव आखला जात आहे.