राष्ट्रीय स्पर्धेत सांगलीतील बहिण-भाऊ ठरले ‘निष्णात नेमबाज’, दिल्लीत पार पडल्या स्पर्धा
By घनशाम नवाथे | Updated: January 13, 2025 21:25 IST2025-01-13T19:14:12+5:302025-01-13T21:25:44+5:30
दिल्लीत स्पर्धा : १२ बोअर शॉटगन- ट्रॅप क्रीडा प्रकारात यश

राष्ट्रीय स्पर्धेत सांगलीतील बहिण-भाऊ ठरले ‘निष्णात नेमबाज’, दिल्लीत पार पडल्या स्पर्धा
घनशाम नवाथे
सांगली :दिल्ली येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शरयू आणि आदित्य मोरे या बहीण, भावाने १२ बोअर शॉटगन- ट्रॅप या प्रकारात निष्णात नेमबाज (रिनाउंड शूटर) होण्याचा बहुमान मिळवला. जिल्हा पोलिस दलातील नेमबाज तथा सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांची ती मुले आहेत.
आदित्य मोरे हा अभियंता असून तो सध्या पुण्यातील डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूटमधे येथे मास्टर ऑफ टेक्नोलॉजीचे शिक्षण घेतो आहे. तर शरयू मोरे ही बारामती येथे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकते. दोघेही उच्चशिक्षण घेत असताना त्यांनी नेमबाजी क्रीडा प्रकारातही विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. शहर पोलिस निरीक्षक मोरे यांचे मूळ गाव सासुर्वे (जि. सातारा) असून सध्या शरयू, आदित्य दोघेही कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. तेथील जे. बी. कुसाळे शूटिंग फाउंडेशनचे सदस्य आहेत. निरीक्षक मोरे यांनाही महाविद्यालयीन स्तरापासून नेमबाजी स्पर्धेत रस होता. त्यांनीही अनेक स्पर्धेत यश मिळवले आहे. त्यांचाच आदर्श घेऊन दोघांनी नेमबाजीची निवड केली.
दिल्ली येथील स्पर्धेत देशभरातून हजारहून अधिक खेळाडू पात्र ठरले होते. अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या १२ बोअर शॉटगन- ट्रॅप या क्रीडा प्रकारात दोघांनी यश मिळवले. दोघांनाही विजेतेपदासह ‘निष्णात नेमबाज’ होण्याचा बहुमान मिळवला. शरयू हिने राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापूर्वी पाच सुवर्ण, एक रौप्य, तर दोन कास्य पदकांची कमाई केली आहे. बालेवाडी (पुणे) येथील प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांचे दोघांना मार्गदर्शन लाभले आहे.