महामंडळासाठी नेत्यांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:11 PM2018-05-06T23:11:57+5:302018-05-06T23:11:57+5:30

Brother-in-law of the leaders for the corporation | महामंडळासाठी नेत्यांची भाऊगर्दी

महामंडळासाठी नेत्यांची भाऊगर्दी

Next

अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : महामंडळावर वर्णी लागावी म्हणून जिल्ह्यातील इच्छुकांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत—व्हाया कोल्हापूर—मुंबई अशा वाऱ्या वाढवल्या आहेत. इस्लापूर पालिकेतील पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात ठाण मांडले आहे. सांगली जिल्ह्यात एखादे महामंडळ मिळण्याची शक्यता आहे. तरीसुध्दा इच्छुकांची मोठी भाऊगर्दी दिसत आहे. लवकरच या निवडी होणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांच्या मुंबई वाºया वाढल्या आहेत.
जिल्ह्यात आघाडी काँग्रेसकडे असलेले बुरुज ढासळण्याच्या स्थितीत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील, काँग्रेसचे पतंगराव कदम यांच्या निधनाने भाजपविरोधी गोटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यासाठी आता स्वत: आमदार जयंत पाटील काँग्रेसची आघाडी करण्यासाठी सरसावले आहेत. नुकतीच जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. यामुळे जयंत पाटील यांनाच शह देण्यासाठी भाजपकडून जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद आणि एक महामंडळ दिले जाईल, अशी शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याचा शब्द आजही भाजपने पाळलेला नाही. उलट शेतकरी चळवळीतील सदाभाऊ खोत यांना मागील दाराने मंत्रीपद दिले. त्यामुळे भाजपमधील ज्येष्ठ आमदारांच्यात नाराजीचा सूर आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीमधून आयात केलेले नेतेच वरचढ होऊ लागले आहेत. ते आजही भाजपमध्ये मुरलेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
यामध्ये आमदार सुधाकर खाडे यांना मंत्रीपद आणि इस्लामपूर पालिकेतील पक्षप्रतोद विक्रम पाटील, भाजपचे स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांची नावे आघाडीवर आहेत. आमदार शिवाजीराव नाईक यांचे कट्टर समर्थक सुखदेव पाटील, आष्टा येथील वैभव शिंदे, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील यांचीही नावे घेतली जात आहेत. याव्यतिरिक्त भाजपमधील अनेकांनी महामंडळासाठी फिल्डिंग लावली आहे. लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जयंत पाटीलच टार्गेट
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद आता इस्लामपूर येथे एकवटली आहे. त्याचबरोबर जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर त्यात भर पडली आहे. त्यामुळे भाजपपुढे इस्लामपूर मतदार संघाचे मोठे आव्हान असणार आहे. अगोदरच शेतकºयांच्या चवळवळीच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद दिले आहे. जयंत पाटील यांना टार्गेट करुनच इस्लामपूर मतदार संघातील भाजपचे विक्रम पाटील व वैभव शिंदे यांची महामंडळावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निष्ठेचा प्रश्न ऐरणीवर
महामंडळावर वर्णी लागण्यासाठी सांगली जिल्ह्यातील भाजप नेते सरसावले आहेत. परंतु खासदार संजय पाटील यांना कृष्णा खोरेचे अध्यक्षपद देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासंबंधी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चाही झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे पुन्हा निष्ठेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.

Web Title: Brother-in-law of the leaders for the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.