भाऊ गेला; मग मीही आत्महत्या करतो !
By admin | Published: April 5, 2017 12:38 AM2017-04-05T00:38:02+5:302017-04-05T00:38:02+5:30
काळजीच्या रस्त्याने धरली मृत्यूची वाट : जगन्नाथ यांच्या कॉलनंतर नातेवाईक हादरले; शोध घेतला, पण हाती आला मृतदेह
कऱ्हाड : विजयने विषारी औषध प्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर लगबगीने कऱ्हाडला यायला निघालेले जगन्नाथ विजयच्या मृत्यूच्या बातमीनंतर मात्र थबकले. ‘विजय संपला, आता मी येऊन काय करू? मी पण आत्महत्या करतो,’ असे म्हणत त्यांनी नातेवाइकांचा फोन ठेवला. त्यानंतर नातेवाइकांनी तातडीने शोध सुरू केला. मात्र, त्यांच्या हाती निराशाच लागली. विजयपाठोपाठ जगन्नाथ यांनीही आपली जीवनयात्रा संपवली.
वडगाव हवेली येथील जगन्नाथ व विजय चव्हाण या दोन्ही बंधूंनी सोमवारी रात्री कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेने जिल्हा हादरला. शेतकरी कर्जमाफीसाठी रान पेटले असताना या दोन बंधूंची संपलेली जीवनयात्रा अनेकांना चटका लावून गेली. वडगाव हवेली येथे चव्हाण कुटुंबीयांची सुमारे तीन एकर शेती आहे. जगन्नाथ व विजय दोघेही पदवीधर. मात्र, सुरुवातीला ते शेती सांभाळत कुटुंब चालवित होते.
सुमारे दहा वर्षांपूर्वी या दोघांनी ओगलेवाडी येथे कृषी सेवा केंद्र सुरू केले. हे दुकान विजय सांभाळत होते. तर जगन्नाथ यांनी शेतीकडे लक्ष दिले. दुकान तसेच शेतीसाठी त्यांनी बँकांचे कर्ज काढले होते. अशातच शेतीपूरक व्यवसाय करण्याच्या उद्देशाने या बंधूंनी कडेगाव येथील औद्योगिक वसाहतीत सरकी पेंड निर्मितीची कंपनी सुरू केली. जे. पी. अॅग्रो प्रोडक्टस् नावाच्या या कंपनीतून भरघोस नफा मिळवून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा या बंधूंचा प्रयत्न होता. सुरुवातीच्या कालावधीत कंपनीचे उत्पादन व विक्रीही चांगली झाली. मात्र, काही कालावधीत कंपनी डबघाईला आली. शेतीतील अल्प उत्पादन, कृषी सेवा केंद्रातून मिळणारा अत्यल्प नफा तसेच कंपनी तोट्यात गेल्यामुळे पुढे काय, हा प्रश्न या बंधूंसमोर उभा राहिला.
खताचे दुकान तसेच कंपनीसाठी या बंधूंनी कऱ्हाडातील दोन बँकांकडून सुमारे साठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील काही रकमेची त्यांनी परतफेडही केली होती. मात्र, कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच होता. सुमारे वर्षापूर्वी विजय हे पत्नी पूनम व विराज, रूद्र या मुलांसमवेत विद्यानगरमध्ये राहण्यास आले. तर जगन्नाथ हे आई लक्ष्मी, पत्नी सुरेखा आणि पंकज व जयंत या मुलांसमवेत वडगाव हवेली येथे राहत होते.
विजय सकाळी घरातील आटोपून लवकर ओगलेवाडी येथील दुकानात येत होते. तर जगन्नाथ घरातील व्याप, शेती सांभाळत कडेगाव येथील कंपनी चालवत होते. गत महिन्यापासून बँकांनी या दोघांमागे थकित कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावला. गाठीला काहीही पैसे नसताना कर्ज कसं फेडणार, असा प्रश्न या बंधूंसमोर होता. त्यातच बँकांच्या नोटीसही येत होत्या.
व्यापाऱ्यांचे फोन येत होते. त्यामुळे दोघेही तणावाखाली असायचे. याच तणावातून सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास विजय यांनी दुकानातच विषारी औषध प्राशन केले. त्यांना रुग्णालयात नेताना मित्रांनी याबाबतची माहिती फोनवरून जगन्नाथ यांना दिली. त्यावेळी जगन्नाथ यांनी ‘मी निघालोय, थोड्या वेळातच पोहोचतो,’ असे सांगितले.
विजय यांना रुग्णालयात पोहोचविल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे मित्रांनी तातडीने याबाबत जगन्नाथ यांना कळवले. विजय यांचा मृत्यू झाल्याचे समजताच जगन्नाथ हताश झाल्याचे मित्रांना जाणवले. ‘विजय संपलाय तर मी येऊन काय करू, मी पण आत्महत्या करतो,’ असे जगन्नाथ म्हणाले. यावर मित्र काही बोलण्यापूर्वीच जगन्नाथ यांनी फोन कट केला. त्यानंतर त्यांचा मोबाईल कायमचाच स्विचआॅफ झाला. (प्रतिनिधी)
सर्व कुटुंबीय
सकाळपर्यंत अनभिज्ञ
विजय यांच्यापाठोपाठ जगन्नाथ यांनी आत्महत्या केली. कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष अचानक गेल्यानंतर ग्रामस्थांसह नातेवाइकांनाही धक्का बसला. विजय आणि जगन्नाथ यांच्यानंतर घरात फक्त त्यांच्या पत्नी व आई एवढेच होते. त्यांना मंगळवारी सकाळपर्यंत घटनेची कसलीच माहिती देण्यात आली नव्हती. सकाळी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर घटनेबाबत घरात माहिती देण्यात आली.
ग्रामस्थांचे
प्रशासनाला निवेदन
वडगाव हवेली ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर प्रांत, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक यांच्यासह अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. जगन्नाथ व विजय यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्या दोघांनंतर कुटुंबात कोणीही कर्ते नाही. त्यामुळे कुटुंबीयांचे कर्ज माफ करावे, तसेच या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
शोध घेतला; पण मृतदेह आढळला
‘मी आत्महत्या करतो,’ असे सांगून जगन्नाथ यांनी फोन कट केल्यानंतर रुग्णालयात विजयजवळ असणाऱ्या मित्रांनी तातडीने याबाबत वडगाव हवेली येथे सांगितले. त्यानंतर वडगाव हवेली येथील काही युवक दुचाकीवरून टेंभूमार्गे ओगलेवाडीकडे निघाले होते. त्यावेळी टेंभूनजीक जगन्नाथ यांची दुचाकी आढळून आली. तर रूळावर त्यांचा च्छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला.