सांगलीतल्या भावाची वरात, चक्क महापुरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 PM2021-07-27T16:10:04+5:302021-07-27T16:15:45+5:30
Flood Sangli marriage : कोणी विमानात वधुला वरमाला घालतो, तर कोणी समुद्राच्या तळाला जाऊन शुभमंगलाची संधी साधतो. सांगलीतल्या एका पठ्ठ्याने चक्क महापुरातच लग्नाची वरात काढली. कंबरेइतक्या पाण्यात होडीतून बायकोला घरात आणले.
संतोष भिसे
सांगली : कोणी विमानात वधुला वरमाला घालतो, तर कोणी समुद्राच्या तळाला जाऊन शुभमंगलाची संधी साधतो. सांगलीतल्या एका पठ्ठ्याने चक्क महापुरातच लग्नाची वरात काढली. कंबरेइतक्या पाण्यात होडीतून बायकोला घरात आणले.
सांगलीतला हा पठ्ठ्या भलताच चर्चेत आला असून वरातीचा व्हिडीओ जोरात व्हायरल होत आहे. मारुती चौकात कंबरेइतक्या पाण्यातून नवविवाहित दांपत्य हळदीच्या अंगाने घराकडे येत असल्याचे व्हिडीओतून दिसते. त्याचे झाले असे की, सांगलीत पावसाला उतार मिळताच एकाने लग्नाचा बार उडवून टाकला. पाऊस थांबला तरी रस्त्यावरील पुराने मात्र माघार घेतलेली नव्हती. कृष्णेचा शहरातील मुक्काम कायम होता.
शहरातील मुख्य चौकात म्हणजे मारुती रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी साचून होते. मग काय, नवरदेवाने घरी जाण्यासाठी चक्क होडीच मागवली. मुंडावळ्या बांधलेल्या व शालू नेसलेल्या नवपरिणीत मालकीणीला होडीत बसवले.
नवरा-नवरीची वरात झोकात निघाली. वरातीला बँडबाजा नसला कृष्णेच्या पाण्याचा खळखळाट मात्र सोबत होता. ऐन महापुरातून निघालेल्या जोडप्याला पाहण्यासाठी शहरवासीय इमारतींच्या खिडक्यांमध्ये गर्दी करुन होते. नवरा-नवरीच्या वरातीचा हा थाट चांगलाच चर्चेचा विषय ठरला.