साळमळगेवाडीत तरुणाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:28 AM2021-01-23T04:28:10+5:302021-01-23T04:28:10+5:30
जत : साळमळगेवाडी (ता. जत) येथील दूध व्यावसायिक अजित बाबासाहेब खांडेकर (वय २१) याचा धारदार हत्याराने गळा चिरून व ...
जत : साळमळगेवाडी (ता. जत) येथील दूध व्यावसायिक अजित बाबासाहेब खांडेकर (वय २१) याचा धारदार हत्याराने गळा चिरून व एक हात तोडून आणि पोटात भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आला. खून केल्यानंतर पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान खिलारवाडी रस्त्यावर साळमळगेवाडीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर घडली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा राजू बाबासाहेब खांडेकर यांनी जत पोलिसात फिर्याद दिली. व्यक्तिगत वाद, दूध व्यवसायातील स्पर्धा, आर्थिक देवाण-घेवाण किंवा अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अविवाहित असलेला अजित खांडेकर हा साळमळगेवाडीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कित्तुरे मळ्यात आई. वडील. भाऊ वहिनी अशा कुटुंबासह राहत होता. चार-पाच वर्षापासून ताे साळमळगेवाडी, खिलारवाडी व बिळूर परिसरात दूध संकलन करून जिरग्याळ (ता. जत) येथील दूध डेअरीत घालण्याचा व्यवसाय करत होता. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे ताे घागरी व कँन घेऊन दुचाकीवरुन दूध संकलनासाठी बाहेर पडला. सदाशिव चमकेरी (रा. बिळूर. ता. जत) यांच्या घरातून दूध घेऊन निघाल्यानंतर काही अंतरावर अज्ञात हल्लेखोरांनी अजित खांडेकर याची दुचाकी अडवली. त्याला दुचाकीसह मुख्य रस्त्यापासून सुमारे १०० ते १२५ फूट बाजूला नेऊन गळ्यावर धारदार हत्याराने वार केला. डावा हात तोडून आणि पोटात भोसकून निर्घृणपणे खून केला.
शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दादासाहेब जाधव शेतजमिनीकडे जात असताना त्यांना अजित खांडेकर याची दुचाकी दिसली. जवळ जाऊन पाहिले असता अजित मृतावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी याची माहिती माजी सरपंच आणू खांडेकर व पोलीस पाटील संभाजी माने यांना दिली. जत पोलिसांना माहिती देण्यात आली. खून केल्यानंतर हल्लेखोरांनी पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु संपूर्ण मृतदेह जळालेला नाही. घटनास्थळावरील एकूणच स्थिती पाहता दोन ते तीन हल्लेखोरांनी हा खून केला असावा. असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
सायंकाळी उशिरा अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
फोटो : २२ अजित खांडेकर