कोरोनाच्या आगीतून सुटलेले म्युकरमायकोसिसच्या फुफाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:34+5:302021-05-26T04:26:34+5:30

सांगली : कोरोनाच्या आगीतून सुटलेले रुग्ण म्युकरमायकोसिसच्या फुफाट्यात सापडू लागले आहेत. महागड्या औषधोपचारांमुळे गरीब रुग्णांच्या नातेवाइकांची ससेहोलपट सुरू आहे. ...

In the bubble of mucormycosis escaped from the corona fire | कोरोनाच्या आगीतून सुटलेले म्युकरमायकोसिसच्या फुफाट्यात

कोरोनाच्या आगीतून सुटलेले म्युकरमायकोसिसच्या फुफाट्यात

Next

सांगली : कोरोनाच्या आगीतून सुटलेले रुग्ण म्युकरमायकोसिसच्या फुफाट्यात सापडू लागले आहेत. महागड्या औषधोपचारांमुळे गरीब रुग्णांच्या नातेवाइकांची ससेहोलपट सुरू आहे. उपचारांसाठीचे लाखो रुपये कसे उभे करायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे.

मणेराजुरी येथील रमेश भोसले या गरीब शेतकऱ्यावर कोसळलेले संकट म्युकरमायकोसिसच्या वेदना स्पष्ट करण्यासाठी पुरेसे ठरले आहे. चार-पाच एकर शेतीवर कुटुंबाची गुजराण करणाऱ्या भोसले यांची परिस्थिती जेमतेमच आहे. तीन आठवड्यांपूर्वी लहान भावाला कोरोनाचा संसर्ग झाला. लक्षणे तीव्र नव्हती, शिवाय ऑक्सिजनची पातळीही ९० पेक्षा अधिक होती. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले. एक रुपयाचाही खर्च न करता कोरोनामुक्त झाले; पण त्यानंतर दोन-तीन दिवसांतच म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसू लागली.

भोसले कुटुंबासाठी हा आजार म्हणजे आगीतून सुटल्यानंतर फुफाट्यात पडण्यासारखा ठरला. कोरोनादरम्यान पैशाची अजिबात तोशीस न लागलेल्या भोसले यांची म्युकरमायकोसिसमुळे मात्र फरपट सुरू झाली. भावाला भारती रुग्णालयात दाखल केले. तेथे मोफत उपचारांसाठी महात्मा फुले योजनेचा दिलासा मिळाला. इंजेक्शन्स मात्र विकत आणण्याशिवाय पर्याय नव्हता. डॉक्टरांकडून चिठ्ठ्या मिळताच रमेश भोसले यांची धावाधाव सुरू झाली. इंजेक्शन्स जिल्हा परिषदेत मिळतात असे त्यांना सांगण्यात आले. सांगली शहराची पुरेशी माहिती नसतानाही त्यांनी जिल्हा परिषद गाठली.

वयाच्या साठीतला हा शेतकरी डोक्याला मुंडासे, तोंडावर टॉवेल लपेटून इंजेक्शनच्या रांगेत उभा राहिला. एकावेळी दोन इंजेक्शन्स घ्यायची होती, त्यांची किंमत ५ हजार ८०० रुपये होती. जेमतेम परिस्थिती असणाऱ्या भोसले यांच्यासाठी ही रक्कम मोठी होती. एका कापडी पिशवीत १००, ५०० च्या नोटा घेऊन इंजेक्शनसाठी धडपड सुरू होती. कोरोनातून बाहेर आलेल्या भावाला म्युकरमायकोसिसच्या तावडीतून सोडवायचे होते. इंजेक्शन्सची सोमवारची गरज भागली, पण डॉक्टरांकडून आणखी किती चिठ्ठ्या येतील याचा नेम नव्हता. बेसुमार खर्चामुळे मेटाकुटीला आलेले असे अनेक नातलग जिल्हा परिषदेत सोमवारी पाहायला मिळाले.

कोट

क्रीडा संकुलात एक रुपयादेखील न देता कोरोनाचे उपचार मिळाले, भाऊ बरा झाला. आता या नव्या आजारासाठी पैसा उभा करावा लागत आहे. आमच्यासाठी ही रक्कम आवाक्याबाहेरची आहे. शेतीवर कसेबसे घर चालते. नव्या आजारासाठी किती इंजेक्शन्स द्यावी लागतील याचा नेम नाही. त्यामुळे भीती वाटत आहे.

- रमेश भोसले, रुग्णाचा भाऊ, मणेराजुरी

Web Title: In the bubble of mucormycosis escaped from the corona fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.