६४३ कोटींचे अंदाजपत्रक
By admin | Published: March 24, 2017 11:29 PM2017-03-24T23:29:46+5:302017-03-24T23:29:46+5:30
सभापतींकडून महासभेकडे सादर; प्रशासनाची करवाढ फेटाळली
सांगली : महापालिकेच्या अपूर्ण योजनांच्या पूर्ततेचा संकल्प करीत स्थायी समिती सभापती संगीता हारगे यांनी २०१७-१८ चे ६४३ कोटी ३३ लाख रुपयांचे व १३ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक शुक्रवारी महासभेकडे सादर केले. पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रभागातील कामांची बायनेम तरतूद करीत नगरसेवकांना निवडणुकीची भेट दिली. घरपट्टी, पाणीपट्टी वाढीची प्रशासनाने केलेली शिफारस स्थायी समितीने फेटाळून लावली आहे. उत्पन्नवाढीसाठी कठोर पावले उचलण्याची शिफारसही सभापतींनी केली आहे.
दरम्यान, नगरसेवक शेखर माने, गौतम पवार, संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, गटनेते किशोर जामदार यांनी, नगरसेवकांना या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी महासभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानुसार महापौर हारूण शिकलगार यांनी अंदाजपत्रकीय सभा तहकूब करीत, ३० मार्चला अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात येईल, असे जाहीर केले. महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी ५७९ कोटी ३९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक गत महिन्यात स्थायी समितीकडे सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ६३ कोटी ८० लाख रुपयांची वाढ करीत ६४३ कोटींचे अंदाजपत्रक महापौर शिकलगार यांच्याकडे सादर केले.
महापालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्याच्यादृष्टीने एलबीटी, मालमत्ता कर, विविध फीपासून मिळणारे उत्पन्न, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी बिले यांची थकबाकी वसुली केल्यास ६३ कोटी रुपयांची उत्पन्नवाढ होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने वसुलीवर भर देण्याची गरज आहे. महापालिका हद्दीत अनेक नवीन बांधकामे सुरू आहेत. त्यांचा सर्व्हे करून घरपट्टीची आकारणी केल्यास या करातही मोठी वाढ होईल. शिवाय तत्कालीन सांगली, मिरज नगरपालिकेच्या काळात स्वमालकीच्या इमारतींमधील गाळे नाममात्र भाड्याने दिले आहेत. त्यांची भाडेवाढही करण्यात आलेली नाही. काही गाळेधारकांनी पार्टीशन करून परस्परच हे पोटभाडेकरू ठेवले आहेत. त्यामुळे मालमत्ता विभागाने विनाविलंब याचा सर्व्हे हाती घ्यावा, अशी शिफारसही सभापतींनी अंदाजपत्रकात केली आहे.
पुढीलवर्षी महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना त्यांच्या प्रभाग विकासासाठी सभापतींनी तब्बल ६६ कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद करताना नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांची बायनेम तरतूदही केली आहे. रस्ते, गटारी, विद्युत दिवे यांच्यापासून स्मशानभूमीच्या विकासापर्यंत प्रभागातील किरकोळ कामांचाही अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पहिल्यांदाच महिला सदस्यांकडून अंदाजपत्रक सादर
महापालिका स्थायी समिती सभापती पदाची सूत्रे संगीता हारगे यांच्यारुपाने महिला सदस्याकडे देण्यात आली आहेत. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिला सदस्याने महासभेकडे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी सत्ताधारी काँग्रेससह उपमहापौर गट, स्वाभिमानी आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसनेही संगीता हारगे यांचे कौतुक केले.