पालिकेचे बजेट सहाशे कोटींवर
By admin | Published: March 1, 2017 11:53 PM2017-03-01T23:53:05+5:302017-03-01T23:53:05+5:30
करवाढ फेटाळणार : स्थायी समितीकडून वाढ अपेक्षित
सांगली : महापालिकेच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात स्थायी समितीच्यावतीने तब्बल २२ कोटींच्या उत्पन्नवाढीची शिफारस केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक सहाशे कोटींपेक्षा अधिक होणार आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेली घरपट्टी, पाणीपट्टीतील वाढ मात्र फेटाळण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत करवाढ न करण्याचा पवित्रा स्थायी सदस्यांनी घेतला आहे.
महापालिका प्रशासनाने यंदाचे ५७९.३९ कोटींचे व १६ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी सदस्यांच्या सूचनांचा समावेश करण्यासाठी बुधवारी सभापती संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. स्थायी सदस्यांच्या सूचनेसह लवकरच अंदाजपत्रक महासभेकडे सादर केले जाणार आहे. बुधवारी पालिकेच्या जमा बाजूवर चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, दिलीप पाटील, राजू गवळी, संजय बजाज, बसवेश्वर सातपुते, मनगू सरगर, अलका पवार, प्रार्थना मदभावीकर, प्रियांका बंडगर, शहर अभियंता विजय कांडगावे, आर. पी. जाधव, सुनील आंबोळे आदी अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाने अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न २७० कोटी ८७ लाख रुपये धरले आहे. त्यात आणखी २२ कोटींची भर स्थायी समिती सदस्यांनी सुचविली आहे. यामध्ये घरपट्टीतून सुमारे साडेपाच कोटींची वाढ अपेक्षित आहे. गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. नियमितीकरणाचे प्रस्ताव मार्गी लावल्यास त्यातून सात ते आठ कोटीचे उत्पन्न मिळू शकते. शिवाय त्याच्यावर घरपट्टी लागू करून उत्पन्नवाढ होऊ शकते. पाणीपट्टी तसेच नवीन नळ कनेक्शनद्वारे साडेसात कोटींची वाढ सुचविण्यात आली. मालमत्ता करातून थकित दीड कोटींवर उत्पन्न वसूल झालेच पाहिजे, असे आदेश सभापती संगीता हारगे यांनी दिले. प्रसंगी थकित भाडे न भरणाऱ्यांचे गाळे ताब्यात घेऊन लिलाव काढा, अशा सूचना त्यांनी दिल्या. एलबीटीच्या थकबाकीतूनही सात ते आठ कोटींची उत्पन्नवाढ सुचविण्यात आली. पालिका क्षेत्रात १ लाख २३ हजार मालमत्ता आहेत, मात्र पाणी कनेक्शन्स ७३ हजार आहेत. पालिकेचे कर्मचारी घरपट्टीची बिले वाटप करताना पाणी कनेक्शनचाही सर्व्हे करणार आहेत. त्यातून २५-३० हजार नवीन पाणी कनेक्शन्स वाढणार आहेत, शिवाय बोगस कनेक्शन्सची माहितीही मिळेल. (प्रतिनिधी)