महापालिकेचे बजेट ६०३ कोटींवर
By admin | Published: April 1, 2016 01:04 AM2016-04-01T01:04:22+5:302016-04-01T01:24:40+5:30
महासभेकडे सादर : ‘स्थायी’कडून १७ कोटींची वाढ
सांगली : नागरिकांवर कराचा बोजा न टाकता शहराचे रूप बदलण्याचे स्वप्न दाखवीत गुरुवारी स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी महापालिकेचे २०१६-१७ चे अंदाजपत्रक महासभेकडे सादर केले. आयुक्तांच्या अंदाजपत्रकात १७ कोटींची वाढ केल्याने पालिकेचे अंदाजपत्रक ६०३ कोटी २३ लाखांवर गेले आहे. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने सभापतींनी अनेक उपाययोजना अंदाजपत्रकात सुचविल्या आहेत.
पालिकेच्या नगरसेवकांना या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी गुरुवारची महासभा तहकूब करण्यात आली. आता ११ एप्रिलला अंदाजपत्रकावर चर्चा होणार असल्याचे महापौर हारुण शिकलगार यांनी जाहीर केले. पालिका आयुक्त अजीज कारचे यांनी ८५८ कोटी ८५ लाख रुपये जमेचे व ३६ लाख ३८ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या सदस्यांनी सूचना करून आज अंदाजपत्रक महासभेकडे सादर करण्यात आले.
स्थायी समितीने जमेच्या बाजूला ९ कोटी ५९ लाख रुपयांची वाढ केली आहे. यात घरपट्टीतून अडीच कोटी, बांधकाम दंडात्मक शुल्कातून एक कोटी, पाणीपट्टीतून चार कोटी, चर दुरुस्तीतून एक कोटीच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे. खर्चाच्या बाजूला ३४ कोटी ९१ लाख रुपयांची वाढ करतानाच आयुक्तांच्या अंदाजपत्रकातील १७ कोटी ७६ लाख रुपयांच्या तरतुदीला कात्री लावली आहे. या प्रामुख्याने ड्रेनेज चर दुरुस्तीचे सव्वा कोटी, मिरज सभागृह, आयुक्त निवासस्थान, वारकरी भवन, नवीन गटारी व नाले, औद्योगिक वसाहतीतील रस्ते, वॉर्ड विकास निधी, सरकारी घाटाचे सुशोभीकरण यांचा समावेश आहे.
अंदाजपत्रकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी दहा लाखांची तरतूद केली आहे. शहरात अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे सुरू आहेत. त्याचा सर्व्हे करण्यासाठी पालिकेकडे मनुष्यबळ नाही. खासगी एजन्सी नियुक्त करून बेकायदा बांधकामाचा सर्व्हे करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय आरोग्य विमा, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, सांगली व कूपवाडला गॅस दाहिनी, समाजमंदिरे, उद्यान, गटारी यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)