Sangli: बुधगावच्या चोरट्यास अटक; पावणे तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त
By घनशाम नवाथे | Published: February 7, 2024 04:01 PM2024-02-07T16:01:56+5:302024-02-07T16:02:10+5:30
सांगली : विजयनगर, होळकर चौक, मीरा हौसिंग सोसायटी येथील बंद फ्लॅट फोडणाऱ्या स्वप्नील मोहन तरसे (वय ३१, रा. ज्ञानेश्वरनगर, ...
सांगली : विजयनगर, होळकर चौक, मीरा हौसिंग सोसायटी येथील बंद फ्लॅट फोडणाऱ्या स्वप्नील मोहन तरसे (वय ३१, रा. ज्ञानेश्वरनगर, बुधगाव, ता. मिरज ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडील तीन गुन्ह्यातील १२ लाख ७२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कार्यरत होते. तेव्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सोन्याचांदीचे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी उद्योग भवनजवळील मोकळ्या जागेत येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता प्लास्टिकची पिशवी घेवून थांबलेला संशयित निदर्शनास आला.
त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पलायनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास संधी न देता पकडून तपासणी केली. झडतीमध्ये त्याच्याकडील पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने विजयनगर चौकातील सैनिक नगर, होळकर चौक आणि मिरा हौसिंग सोसायटीमधील बंद फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडील पावणे तेरा लाखाचे दागिने घरफोडीतील असल्याचेही कबुल केले. स्वप्नील तरसे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी, चोरी आदी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिस निरिक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक पंकज पवार आणि कुमार पाटील यांच्यासह कर्मचारी बिरोबा नरळे, सागर लवटे, संदिप गुरव, नागेश खरात, दरीबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, सागर टिंगरे, उदयसिंह माळी, अनिल कोळेकर, संदीप नलावडे यांच्या पथकाने कारवाई केली.