दुष्काळी भागात औद्योगिक वसाहती उभ्या करा : सुरेश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 04:28 PM2020-08-21T16:28:04+5:302020-08-21T16:31:23+5:30
विजापूरमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे विजापूरपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असलेल्या जत तसेच कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात नवी औद्योगिक वसाहत उभी केल्यास तालुक्यांसह जिल्ह्याच्या अर्थचक्रास बळ मिळणार आहे.
सांगली : विजापूरमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे विजापूरपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असलेल्या जत तसेच कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात नवी औद्योगिक वसाहत उभी केल्यास तालुक्यांसह जिल्ह्याच्या अर्थचक्रास बळ मिळणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहत उभारण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनादवारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या कर्नाटकातील विजापूर येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट चे काम सुरू आहे. एकूण ३५० एकर जमिनीमध्ये विमानतळ उभारणीचे काम सुरु झाले आहे. विजापूर हे सांगली शहरापासून २ तासाच्या तर जतपासून अवघ्या १ तासाच्या अंतरावर आहे. त्याठिकाणी होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
जतसारखा दुष्काळी पट्टा, कवठेमहांकाळ आणि आटपाडी येथील दुष्काळी भाग अनेक वर्षापासून अडचणीत आहे. या भागांमध्ये जर औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात उभारल्या तर त्याचा उपयोग सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी होणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यानंतर आपल्या भागाला ही पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या तिन्ही तालुक्यातल्या दुष्काळी पट्टयामध्ये जर ४ ते ५ हजार एकराची औद्योगिक वसाहत तयार केली तर संपूर्ण सांगली जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
या तिन्ही तालुक्यातून नागपूर, रत्नागिरी महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याचप्रमाणे पुणे, हडपसर, जेजुरी, फलटण, विटा, चिक्कोडी, बेळगाव हा महामार्ग सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या तिन्ही तालुक्यांमध्ये औद्योगिक वसाहत उभारणी सुरु केली तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या सर्व बेरोजगार युवकांना फार मोठी उपलब्धी ठरु शकते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या मोठ्या उद्योगांना जास्तीत जास्त सवलती देऊन त्यांना या भागामध्येच उद्योग उभारण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आपल्या भागामध्ये मोठ्या इंडस्ट्रीज येऊ शकतील.
कोविड संकटकाळात पुणे, मुंबई अशा महानगरातील उद्योगांची बेरोजगारी वाढत चाललेली आहे. असे बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने आपल्या भागात येवू लागले आहेत. अशा सर्व युवकांना मोठी संधी उपल्ब्ध होऊ शकेल. तरी यासाठी महाराष्ट्र सरकारने तिन्ही तालुक्यातल्या टप्प्यांमध्ये अशा प्रकारची मोठी औद्योगिक वसाहत केली तर त्याचा उपयोग होऊ शकेल.
या तीनही दुष्काळी टप्प्यांमध्ये पाण्याच्या योजना मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या भागांमध्ये कृषी उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे कृषीवर आधारित अनेक उदयोग येथे होऊ शकतील. औद्योगिक वसाहती निर्मितीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या समवेत उच्चस्तरीय बैठक आयोजित करून निर्णय घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.