नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा उद्योग उभारा: नानासाहेब पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:23 PM2019-05-12T23:23:49+5:302019-05-12T23:23:54+5:30
सांगली : तरुणांना आपल्या आयुष्यात अनेक संधी उपलब्ध होत असतात. उमेदीच्या वयात कोणत्या तरी राजकीय नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा, ती ...
सांगली : तरुणांना आपल्या आयुष्यात अनेक संधी उपलब्ध होत असतात. उमेदीच्या वयात कोणत्या तरी राजकीय नेत्यांच्या मागे फिरण्यापेक्षा, ती शक्ती तरुणांनी उद्योगात लावावी. आलेल्या अनुभवाच्या जोरावर उद्योगात अग्रेसर रहावे. पाश्चिमात्य देशात उद्योग उभा करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देऊन उद्योगासाठी मार्गदर्शन केले जाते. त्याप्रमाणेच जागतिक बाजारपेठेचा विचार करून प्रशिक्षण घेऊन युवकांनी आत्मविश्वासाने उद्योगात संधी निर्माण करावी, असे आवाहन माजी सनदी अधिकारी नानासाहेब पाटील यांनी रविवारी सांगलीत केले.
मराठा सेवा संघ संचलित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या केंद्रीय कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा सेवा संघाची राज्य कार्यकारिणी पदाधिकारी बैठक आणि जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम झाला.
पाटील म्हणाले, आपल्या उद्योगात उतरणाºया तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. यामुळेच अनेक तरुणांना नवीन काही तरी करण्याची जिद्द असतानाही, त्यांची कुचंबणा होते. या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशात युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जाते. आता उद्योग उभारणीतील ध्येय-धोरणे बदलत असल्याने तरुणांनी योग्य ते प्रशिक्षण घेऊनच उद्योगात उतरावे, जेणेकरून कसोटीच्या काळातही त्यावर मात करण्याची क्षमता निर्माण होऊ शकेल.
मराठा सेवा संघाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसºयादिवशी पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा अहवाल सादर करत, येत्या तीन महिन्यात करावयाचे नियोजन करण्यात आले. प्रदेश कार्यकारिणीची पुढील बैठक अकोला येथे जुलै महिन्यात घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी उद्योजक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुधाकर पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शीतल मोरे, आशा पाटील, जयश्री घोरपडे, शाहीर पाटील यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
देशभरातील तरुणांना सांगलीतून मिळणार मार्गदर्शन
मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे राज्य प्रदेशाध्यक्ष विजयराव घोगरे, नानासाहेब पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन केले जाणार असून, त्यांना येणाºया अडचणींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. देशातील मराठा तरुणांना सांगलीतील या कार्यालयातून मार्गदर्शन केले जाणार आहे.