अग्निशमन विभागाची इमारत धूळ खात उद्योजकांत नाराजी
By admin | Published: December 8, 2014 11:52 PM2014-12-08T23:52:14+5:302014-12-09T00:27:38+5:30
अग्निशमन केंद्र सुरू करण्याची मागणी, महापालिकेचे दुर्लक्ष
महालिंग सलगर - कुपवाड मिरज औद्योगिक वसाहतीमधील नगरपरिषदेपासून महापालिकेपर्यंतची स्थित्यंतरे अनुभवलेली अग्निशमन केंद्राची इमारत सध्या महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडून आहे़ यामुळे मिरजेतील उद्योजकांमध्ये नाराजी पसरली असून, याठिकाणी महापालिकेचे अग्निशमन केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी उद्योजकांमधून होऊ लागली आहे़ मिरज औद्योगिक वसाहतीची स्थापना १९७१ मध्ये झाली़ त्यानंतर १९७३ मध्ये प्रत्यक्षपणे या एमआयडीसीचे काम सुरू झाले़ या एमआयडीसीमध्ये टेक्स्टाईल, इंजिनिअरिंग, कॅटल फीड, स्टार्च, फौंड्रीसह इतर अनेक प्रकारचे उद्योग सुरू झाले़ त्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाने या सुरू झालेल्या उद्योगासाठी अग्निशामन केंद्र सुरू केले होते़ अग्निशमन केंद्रामध्ये एक अग्निशामक गाडी आणि कर्मचारी वर्ग दिला होता़ ही व्यवस्था प्रारंभी औद्योगिक विकास महामंडळाने चांगल्याप्रकारे सुरू ठेवली होती़ मात्र, हे औद्योगिक क्षेत्र मिरज नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाकडून १९८३ मध्ये मिरज नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आले़ थोड्या कालावधीपर्यंत हे अग्निशमन केंद्र सुरू ठेवले होते़ परंतु, काही दिवसानंतर हे केंद्र बंद करण्यात आले़ त्यातील अग्निशमन केंद्राची गाडी महापालिकेने मिरज मार्केटला नेली़ तर कर्मचारीवर्ग एमआयडीसीकडे वर्ग केला़ त्यानंतर नगरपरिषदेची महापालिका झाली़ मिरजेतील उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या़ परंतु, महापालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केले़ नगरपरिषद व महापालिकेने या अग्निशमन इमारतीकडे आजपर्यंत ढुंकूनही पाहिले नाही़ लाखो रूपयांची मालमत्ता आता दुर्लक्षामुळे धूळ खात पडून आहे़ या ठिकाणी अग्निशमन केंद्राच्या इमारतीसह कर्मचाऱ्यांच्या घरांचीही दुरवस्था झाली आहे़ इमारतीमध्ये अवैध धंदे सुरू असतात़ ही इमारत गाढवे व मोकाट कुत्र्यांचे आश्रयस्थान बनले आहे़ अग्निशामन केंद्राची दुरवस्था थांबवून या ठिकाणी महापालिकेने त्वरित केंद्र सुरू करण्याची मागणी मिरज एमआयडीसीतील उद्योजकांतून व्यक्त होऊ लागली आहे़ उद्योजकांच्या मागणीला टोपली... सांगली, मिरज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग मित्रच्या बैठकीत या अग्निशमन केंद्राच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित केला़ परंतु, महापालिकेने केवळ उद्योजकांच्या तोंडाला पानेच पुसण्याचे काम केले आहे़ तसेच उद्योजकांच्या मागणीला केवळ केराची टोपली दाखविली आहे़ उद्योग मित्रमध्ये वरिष्ठ अधिकारी येत नसल्यानेच हा प्रश्न प्रलंबितच राहिला असल्याचे अनेक उद्योजकांनी सांगितले आहे़