सांगलीतील वायफळे येथील उरुसात मानाच्या बैलगाड्याला अपघात, पळताना बैल घसरून पडल्याने फरफटत गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:18 PM2023-03-15T15:18:27+5:302023-03-15T18:40:13+5:30
या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात
तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील उरुसास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने मानाचा बैलगाडा पळवला जातो. या गाड्याला सलग दुसऱ्या वर्षी अपघात झाला. गाडा पळवत असताना एक बैल घसरून पडला. तो १०० ते ११० फूट फरफटत गेला. याचवेळी गाड्यातील लोकांनी बाहेर उड्या मारल्या. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. तर फरफटत गेलेल्या बैल जखम झाली आहे. तत्पूर्वी बैल गाड्यासह रस्ता सोडून दुसरीकडे गेल्याने काही दुचाकींचेही नुकसान झाले आहे.
वायफळे येथील हिंदू-मुस्लीम बांधव एकत्रित येऊन पीर गैबीसाहेब यांचा उरुस उत्साहात साजरा करतात. त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. गंध व पीर गैबीसाहेब यांचा नैवेद्य पार पडला. आज रात्री तमाशाही होत आहे. तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळी गावातील प्रमुख रस्त्यावरून मानाचा गाडा पळवण्यात आला.
हा गाडा तलाठी कार्यालयासमोर आल्यानंतर गाड्याचे बैल भरकटले. ते रस्ता सोडून दुसरीकडेच गेले. तेथील दुचाकी रस्त्यावर पडल्या. या दुचाकींचे थोडेफार नुकसान झाले. त्यानंतर हा गाडा पळत बसस्थानकाच्या दिशेने आणण्यात आला. बसस्थानकावरून तो पुढे जात असताना अचानक एक बैल कोसळला. इतर तीन बैलांनी त्याला जवळजवळ १०० फूट फरफटत नेले. याचवेळी गाड्यातील लोकांनी खाली उड्या मारल्या. यामध्ये बैल व एक जण जखमी झाला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा गर्दी
या गाड्याचा मान कडेमळा येथील भाविकांना आहे. त्यानुसार सायंकाळी हा गाडा सजवून गावात आणण्यात आला. सायंकाळी चार बैल जुंपलेला हा गाडा प्रमुख रस्त्यावरून सोडण्यात आला. गाड्याचा पुढे काही जण पळत होते. गाड्याचा आडवे कोणी येऊ नये, याची काळजी घेतली जात होती. हा गाडा पाहायला रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती.