बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अन्यथा राज्यभर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:37+5:302021-08-12T04:30:37+5:30
कवठेमहांकाळ : राज्यात बंदी असलेल्या बैलगाडी शर्यती सुरू करा, अन्यथा राज्यभर बैलांसोबत मोर्चे काढले जातील, असा इशारा बैलप्रेमी संघटनेकडून ...
कवठेमहांकाळ : राज्यात बंदी असलेल्या बैलगाडी शर्यती सुरू करा, अन्यथा राज्यभर बैलांसोबत मोर्चे काढले जातील, असा इशारा बैलप्रेमी संघटनेकडून मंगळवारी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तहसीलदार बी. जे. गोरे यांना मंगळवारी बैलप्रेमी संघटना ढालगाव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, राज्यात गेली दहा वर्षे बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे. त्यामुळे राज्यातील खिलार जनावरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खिलार जनावरांचा गोवंश वाचला पाहिजे. बैल, खिलार गायी यावर राज्यातील ७० टक्के शेतकऱ्यांचे कुटुंब चालते. यांच्या पालनपोषणावर मोठा खर्च शेतकरी करीत असतो; परंतु शासनाला याचे काही देणे-घेणे नाही. असे निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, तसेच खिलार जनावरांच्या संरक्षण, संवर्धनासाठी बैलगाडी शर्यती सुरू झाल्या पाहिजेत. १२ ऑगस्टपर्यंत बैलगाडी शर्यती सुरू करण्याचा आदेश काढला नाही तर या राज्यात सर्वत्र बैलांसह मोर्चे काढले जातील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर दगडू कोळेकर, संजय शेंबडे, नवनाथ खुंटाळे, सोमनाथ घागरे, लिंबाजी कोळेकर, सागर घागरे, राहुल वावरे, प्रल्हाद माने, दादा कोळेकर, बिरू निळे, विकास बंडगर, संतोष खरात, बाळू मलमे यांच्यासह शेकडो बैलप्रेमींच्या सह्या आहेत.