Sangli: बैलांना बॅटरीचा शॉक, लाठ्यांनी मारहाण; शर्यतींमधील छळसत्र सुरूच; तासगाव तालुक्यातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:13 PM2024-04-23T12:13:36+5:302024-04-23T12:15:20+5:30
परवानगीलाच दिला जातोय फाटा
सांगली : न्यायालयाच्या निर्बंधानंतरही बैलगाडी शर्यतींमध्ये गैरप्रकार सुरूच आहेत. परवानगीशिवाय शर्यतींचे प्रमाणही वाढले असून त्याकडे महसूल प्रशासन आणि पोलिसांचा कानाडोळा दिसत आहे.
तासगाव आणि पलूस तालुक्यात शनिवारी व रविवारी झालेल्या शर्यतींत सर्रास गैरप्रकार दिसून आले. बैलांना बॅटरीचे शॉक देणे, काठीने मारहाण करणे, शेपटी पिरगाळणे, टोचणे असे गैरप्रकार सुरू होते. या शर्यतींना पोलिसांची किंवा प्रशासनाची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. शर्यतीत बैलांचा छळ होत असल्याच्या कारणास्तव प्राणीमित्रांनी सर्वोच्च न्यायालयात शर्यतींना आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने निर्बंध लादले. मनाईवर फेरविचार करताना काही अटी व शर्तींसह शर्यतींना परवानगी देण्यात आली. संपूर्ण शर्यत कायदेशीर अटींचे पालन करून पार पाडण्याचे आदेश देण्यात आले. पण या अटींचे पुरेपूर पालन होत नसल्याचे दिसत आहे.
पलूस आणि तासगाव तालुक्यांतील या शर्यतींमध्येही बैलांना काठीने मारहाण, बॅटरीचा शॉक देणे असे प्रकार घडले. यामुळे प्राणीमित्रांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परवानगीलाच दिला जातोय फाटा
शर्यतीसाठी अनामत रक्कम कमी करूनही परवानगी घेण्याची काळजी संयोजक घेत नाहीत. वाढदिवस, जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने शर्यत घेता येणार नाही, असेही आदेश आहेत, तरीही शर्यती घेतल्या जात आहेत. सध्या तर अनेक गावांत परवानगी न घेताच मैदान भरवले जात आहे. परवानगी घेतल्यास पोलिस बंदोबस्त लागू होतो, शर्यतीच्या अंतरावर निर्बंध येतात, शर्यतीपूर्वी बैलांची आरोग्य तपासणी करावी लागते. हे सारे टाळण्यासाठी परवानगीलाच फाटा देण्यात येत आहे.