इस्लामपुरात गुंडगिरी फोफावतेय

By admin | Published: March 14, 2016 10:20 PM2016-03-14T22:20:54+5:302016-03-15T00:13:15+5:30

पोलिसांचे दुर्लक्ष : गल्लीबोळातून गुन्हेगारीचा आलेख वाढतोय

Bullying in Islampuri lies | इस्लामपुरात गुंडगिरी फोफावतेय

इस्लामपुरात गुंडगिरी फोफावतेय

Next

अशोक पाटील-- इस्लामपूर शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतंच चालला आहे. गेल्या काही वर्षात पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांना न्याय देण्यापेक्षा तडजोडीचेच पेव फुटले आहे. तसेच राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली वावरत असलेल्या गल्लीबोळात फाळकूट दादांची संख्या वाढू लागली आहे. त्यांना लगाम घालण्यात पोलीस अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुका पार पडेपर्यंत काही अतिसंवेदनशील चौकात टोळीयुध्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या शहरात राजरोसपणे मटका सुरु आहे. हा व्यवसाय राजकीय लोकांच्या वरदहस्ताखाली सुरु असून या व्यवसायात मोठी स्पर्धा सुरु आहे. लागलेल्या आकड्याचे पैसे जो लगेच देईल, त्याच बुकीकडे ग्राहकांचा लोंढा वाढला आहे. शहरातील बहुतांश टपऱ्यांमधून खुलेआम मटका सुरु आहे. पालिका प्रशासन त्यांच्याकडून कायदेशीररीत्या जागेची कर वसुली करुन या व्यवसायाला अभयच देत आहे.
गेल्या काही महिन्यात शहरात ४ खून झाले आहेत, तर काही गावगुंडांनी हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. खंडणी, सावकारी या व्यवसायाला तर उधाण आले आहे. यातूनच होणाऱ्या पैशाच्या जुळवाजुळवीवर नगरपालिकेची आगामी निवडणूक अवलंबून असल्याची चर्चा गावगुंडांकडून होत आहे.
आगामी पालिका निवडणुकीत छोटे प्रभाग असणार आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातच राष्ट्रवादीत ३ गट सक्रिय आहेत. या गटनेत्यांच्या ताकदीवरच गल्लीबोळातून नवीन उमेदवार निर्माण होऊ लागले आहेत.
या गटनेत्यांनी आपणास उमेदवारी दिली नाही, तर बंडखोरी करण्याच्या तयारीतही काहीजण आहेत. त्यामुळे पक्षांतर्गतच मोठा संघर्ष पाहावयास मिळणार, अशी चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीच्या विरोधात महाडिक युवा शक्ती, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येऊन निवडणूक लढवत आले असले तरी, सत्ताधारी ही निवडणूक आर्थिक ताकदीवर एकतर्फी जिंकत आले आहेत. आगामी निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीतच बंडखोरी उफाळणार आहे.
शहरात सध्या महाडिक युवाशक्ती, एन.ए., ए.पी. ग्रूप सक्रिय आहेत. त्यांनी आतापासूनच पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लाल चौक, शिराळा नाका परिसर, शिवनगर, शिवाजी चौक, जावडेकर चौक संवेदनशील बनत चालले आहेत. ऐन निवडणुकीत याठिकाणी टोळीयुध्द भडकण्याची शक्यता आहे.


खमक्या अधिकारी हवा
आघाडी शासनाच्या काळात जयंत पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी पोलीस खात्यात अमूलाग्र बदल करू, अत्याधुनिक शस्त्रे देऊ, अशी घोषणा केली होती. परंतु त्यांच्याच इस्लामपूर शहरातील पोलीस ठाण्यात गेल्या १५ वर्षाहून अधिक काळ लोटला तरी, खमक्या पोलीस अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.


गेल्या १0 वर्षात शहर व परिसरात वावरणाऱ्या गुंडांची माहिती घेतली जाणार आहे. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, याची शहानिशा करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शहरात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली जाईल. ज्यांना गुंडगिरीचा त्रास होत आहे, त्यांनी न घाबरता माझ्याशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
- प्रताप मानकर,
पोलीस निरीक्षक, इस्लामपूर.

Web Title: Bullying in Islampuri lies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.